नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत दिल्लीकरांनी ‘आम आदमी पक्षा’चा झाडून पराभव केला असून आपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यात ‘आप’चे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा पराभव झाला आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी या विजयी झाल्या आहेत
निवडणूक आयोगाच्या (Election Commission) अधिकृत वेबसाईटनुसार, भाजपने एकूण ७० जागांपैकी ४७ जागांवर विजय मिळविला आहे. तर एका जागेवर उमेदवार आघाडीवर आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने २२ जागांवर जिंकल्या आहेत. भाजपच्या (BJP) या विजयानंतर तब्बल २७ वर्षांनी नवी दिल्लीत कमळ फुलले आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला भरभरुन मतदान केले. पण त्याच दिल्लीकरांनी आता भाजपच्या झोळीत मतांचे दान टाकले. यंदा दिल्लीत भाजप आणि आपमध्ये थेट निवडणूक झाली. पण या सगळ्यात खरा गेम काँग्रेसने केला. २०१५, २०२० आणि आता २०२५, अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला दिल्लीत भोपळाही फोडता आलेला नाही. पण या निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवालांच्या आपचे मोठे नुकसान केले.
दरम्यान, २०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला ५३ टक्क्यांहून अधिक मतदान (Voting) झाले होते. तर भाजपला ३८.५१ टक्के मतं मिळाली होती. मात्र, यंदा ‘आप’ला ४३.६१ टक्के मते पडली आहेत. तर भाजपला ४५.८८ टक्के मते मिळाली आहेत. दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांमध्ये केवळ २.२७ टक्क्यांचे अंतर आहे. पण त्यामुळे जागांमध्ये पडलेला फरक तब्बल २६ चा आहे. तसेच यंदाही काँग्रेसला १० टक्क्यांहून कमी मते पडली आहेत.