नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Elections) भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत दिल्लीकरांनी ‘आम आदमी पक्षा’चा झाडून पराभव केला आहे. दिल्लीमधील एकूण ७० जागांपैकी जवळपास भाजपने ३९ जागा जिंकल्या आहेत. तर ९ जागांवर मोठी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे ‘आप’ने १७ जागा जिंकल्या असून ५ जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, भाजपने आतापर्यंत ३९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत भाजपची सत्ता निश्चित झाली आहे.
भाजपचे तब्बल २७ वर्षानंतर नवी दिल्लीत कमळ फुलले आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) भोपळाही फोडता आलेला नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून यात ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा समावेश आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी या विजयी झाल्या आहेत. अशातच आता भाजपच्या या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की,” जनशक्ती सर्वेपरि! विकासाचा विजय झाला. सुशासन जिंकले. दिल्लीतील सगळ्या भावा-बहिणींनी आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, त्यासाठी मी त्यांचे वंदन करतो आणि अभिनंदनही. तुम्ही आम्हाला जो आशीर्वाद आणि प्रेम दिले आहे, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आम्ही दिल्लीचा चौफेर विकास करु. तसेच दिल्लीतील लोकांचे जीवन उत्तम बनवण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. ही आमची गॅरेंटी आहे,” असे ते म्हणाले आहेत.
यासोबतच विकसित भारताच्या (India) निर्मितीत दिल्लीची (Delhi) भूमिका महत्त्वाची असेल. मला भाजपच्या (BJP) सर्व कार्यकर्त्यांचा अभिमान आहे. भाजपला मोठे मताधिक्य मिळावे, यासाठी त्यांनी दिवस-रात्र काम केले. आता अजून सक्षमपणे आम्ही दिल्लीकरांची सेवा, करू असेही मोदी यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील विजयाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय म्हणाले?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,”दिल्लीत खोट्या शासनाचा अंत झाला. येथे अहंकार आणि अराजकतेचा पराभव झाला. येथे मोदी की गॅरंटी आणि मोदींच्या विकासाच्या व्हिजनवर दिल्लीकर विजयी झाले आहेत. या प्रचंड जनादेशासाठी दिल्लीच्या जनतेचे मनापासून आभार. मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपाने आपले सर्व आश्वासने पूर्ण करून दिल्लीला देशातील एक नंबर राजधानी बनवण्याचा संकल्प ठेवला आहे”, असे त्यांनी म्हटले.
अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया काय?
दिल्लीत पराभव झाल्यानंतर ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,”मी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की विजय उमेदवार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. गेल्या १० वर्षांत जनतेसाठी केलेले काम त्यांच्यासमोर आहे. जनतेचा निर्णय आम्ही मान्य करतोय. आम्ही आता सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. आम्ही सत्तेसाठी राजकारणात आलो नाहीय, असंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच या निवडणुकांमध्ये उत्तम काम केल्याबद्दल मी आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो”, असेही त्यांनी सांगितले आहे.
भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
दिल्लीत भाजपला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. सध्या भाजपकडून परवेश वर्मा, रमेश बिधुरी,विजेंद्रर गुप्ता, वीरेंद्र सचदेवा, नुपूर शर्मा, दुष्यंत गौतम आणि अभिनेता व खासदार मनोज तिवारी यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी समोर येत आहेत. मात्र, यामधील केजरीवाल यांना पराभूत करणारे परवेश वर्मा, दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि अभिनेता मनोज तिवारी यांची नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते हे बघणे महत्वाचे असणार आहे.