मुंबई । Mumbai
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून राज्यात २७ वर्षांनंतर भाजपची सत्ता येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाच्या सत्तेला भाजपने सुरूंग लावला आहे. या निकालावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला आहे.
अरविंद केजरीवाल यांचा पराभव दारुने केला असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, दिल्ली सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी दारू संदर्भात जे निर्णय घेतले ते चुकीचे होते. पक्ष हा जनतेच्या प्रश्नासाठी असतो, स्वतः साठी नसतो. ज्यावेळेस स्वार्थी राजकारण सुरू होतं त्यावेळेस माणूस संपतो असेही अण्णा हजारे यांनी म्हटले.
अण्णा हजारे यांनी म्हटले की, मी सुरुवातीपासून पक्ष काढण्यास विरोध केला होता. पक्ष आला की त्यात हौसे गवसे आणि नवसे सगळे येतात. त्यामुळे पक्ष बदनाम होतो. अरविंद केजरीवाल यांनी जनतेचा कौल मान्य केला पाहिजे असं मत ज्येष्ठ समाजसेवकांना हजारे यांनी व्यक्त केले. राजकारणात प्रवेश न करण्याचा सल्ला मी अरविंद केजरीवालला दिला होता. समाजसेवा करत देशासाठी काम करण्याचा सल्ला आपण दिला होता. मात्र, त्यांनी तो नाकारला असल्याचेही अण्णा हजारे यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज (८ फेब्रुवारी) रोजी मतमोजणी केली जात आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीतील सहकारी पक्ष काँग्रेस आणि आप हे स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. या निवडणुकीत भाजपा आणि आप यांच्यात अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. यादरम्यान दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दिल्ली विधानसभा निवडणूक मतमोजणीत ४५ जागांवर भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे दिसून आले. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने २५ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसला दिल्लीतील एकाही जागेवर आघाढी घेता आली नाही.