नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशाची राजधानी दिल्लीतील एका उच्चभ्रू भागात बुधवारी सकाळी भीषण अग्निकांडाची घटना घडली आहे. दिल्लीच्या मालवीय नगर परिसरातील हौज रानी येथील एका नामांकित हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ही भीषण आग लागली. आगीत किमान २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. आगीची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी हॉटेलच्या इमारतीतून अचानक आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर निघू लागला. इमारतीमध्ये अडकलेले लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खिडक्या आणि बाल्कनीच्या दिशेने धावू लागले. परिस्थिती इतकी भयानक आणि अनियंत्रित झाली होती की, जीव वाचवण्यासाठी काही लोकांनी थेट इमारतीवरून खाली उड्या मारल्या. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात एकच आक्रोश ऐकू येत होता. ही आग इतक्या वेगाने पसरली की आतल्या लोकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.
बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग वेगाने पसरताच रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
ही आग रेस्टॉरंटच्या तळघरातून सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ११ जणांची सुटका केली. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून, ३८ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला झटका; १२.५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याचा इशारा
अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हॉटेलच्या बेसमेंटसह वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या अनेक लोकांना सुखरूप बाहेर काढले. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र पोलीस आणि अग्निशामक दलाकडून आगीच्या अचूक कारणाचा तपास केला जात आहे.
मृतांमध्ये परदेशी नागरिकांची संख्या जास्त
ज्या रेस्टॉरंट-कम-हॉटेलमध्ये आग लागली, तिथे अनेक परदेशी नागरिक थांबले होते. सध्याच्या माहितीनुसार, हॉटेलला केवळ सहा खोल्या बांधण्याची परवानगी होती, परंतु २५ खोल्या बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्या होत्या. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मालवीय नगर येथील रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीत ठार झालेले बहुतेक लोक परदेशी नागरिक होते.
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवीय नगर येथील आगीच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “दिल्लीतील मालवीय नगर येथे लागलेल्या आगीच्या घटनेत झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. पीएमएनआरएफ (PMNRF) अंतर्गत प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना ५०,००० रुपये दिले जातील.”




