मुंबई | Mumbai
संसदेच्या विशेष अधिवेशन सोमवार ३० नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सर्व खासदारांना तातडीने व्हीप जारी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ३० नोव्हेंबरपासून लोकसभेचे आणि २ डिसेंबरपासून राज्यसभेचे कामकाज सुरू होणार असल्याने या अधिवेशनात महत्त्वाच्या राजकीय आणि घटनात्मक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाच्या खासदारांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विशेष अधिवेशनात महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन आणि संभाव्य घटनादुरुस्तीच्या मुद्द्यांवर सरकारकडून महत्त्वाची पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांना व्हीप जारी झाल्याने पक्षाची आगामी भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकांवर पुढील हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाने खासदारांना व्हीप जारी केल्याची चर्चा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
Nationalist Congress Party-Sharadchandra Pawar (NCP-SCP) issues a whip, directing its Lok Sabha MPs to be present in the Lok Sabha from Monday, 30th November to Friday, 4th December, 2026, without fail and support the Party Stand. https://t.co/oCTssB1xwj— ANI (@ANI) November 27, 2026
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. मुख्य प्रतोद खासदार अमोल कोल्हे यांनी व्हिप जारी केला असून संसदेच्या अधिवेशनात 30 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत लोकसभेत सर्व खासदारांनी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अत्यंत महत्वाच्या कामकाजासाठी न चुकता सर्व खासदारांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत चर्चा देखील झाली असल्याची माहिती आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत प्रत्येक जिल्हाध्यक्षांची मतं जाणून घेतली. शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बहुतेक जिल्हाध्यक्षांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूने कल सकारात्मक आहे. राज्यातील अनेक मतदारसंघातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे मतदारसंघाच विभाजन होणे गरजेच असल्याचं मत व्यक्त करण्यात आले.
30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात हे अधिवेशन पार पडणार आहे. दरम्यान याच अधिवेशनात डिलिमिटेशन बिल सादर केले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील एकदा भाजपकडून संसदेत डिलिमिटेशन बिल मांडण्यात आले होते, मात्र त्यावेळी ते मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे यावेळी हे बिल सादर करण्यापूर्वीच भाजपने मोठी काळजी घेतली असून, मतांची आधीच जुळवाजुळव केल्याची चर्चा आहे. हे बिल मंजूर होण्यासाठी दोन तृतियांश मतांची आवश्यकता आहे.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची भूमिका सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी डिलिमिटेशनच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक विचार करण्याची भूमिका मांडली होती. देशभर लोकसभा मतदारसंघांची संख्या समान प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी याबाबत पक्षाने काही अटी मांडल्या आहेत. मात्र, विधेयकाचा संपूर्ण मसुदा समोर आल्यानंतरच अंतिम भूमिका निश्चित केली जाईल, असे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संसदेत विधेयक सादर झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपल्या सर्व खासदारांना या सर्व पार्श्वभूमीवर व्हीप लागू करण्यात आला आहे.




