सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्योतिर्लिंग त्र्यंंबकेश्वर देवस्थानाचा विकास करावा, यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. त्र्यंबकेश्वरच्या प्रसाद योजनेसाठी मंजूर असलेल्या निधीतील उर्वरित निधी त्वरित अदा करावा, अशी मागणी त्यांनी पर्यटनमंत्र्यांकडे केली.
केंद्र सरकारची तीर्थक्षेत्रांचा विकास होण्याच्या दृष्टीने ‘प्रसाद’ अर्थात तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि अध्यात्मिक वारसा संवर्धन मोहीम ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. त्यात आद्य ज्योतिर्लिंग त्रंबकेश्वर देवस्थानचा देखील समावेश करण्यात आला होता. मात्र 2022 साली या योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतील बराच निधी मिळालेला नसल्याने या योजनेंतर्गत होत असलेली विकासकामे रखडली आहेत. याबाबत त्वरित मार्ग काढावा. प्रसाद योजनेच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरसाठी मंजूर असलेला उर्वरित निधीदेखील त्वरित वितरीत करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी खा. वाजे यांनी केली.
आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचे अध्यात्मिक व पौराणिक महत्त्व लक्षात घेता तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून येथील विकासकामांना अधिक गती देण्याची आवश्यकता असल्याचे खासदार वाजे यांनी शेखावत यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान म्हटले आहे. याबाबत त्वरित माहिती मागवून उचित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन शेखावत यांनी खासदार वाजे यांना दिले.
प्रसाद योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून कामे रखडली आहेत. त्या कामांना गती देण्याची विनंती मंत्रिमहोदयांना केली आहे. जलदगतीने रखडलेली कामे पूर्ण करून नव्याने काही प्रकल्प राबवण्याचा माझा प्रयत्न आहे.
राजाभाऊ वाजे, खासदार
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
काय आहे प्रसाद योजना?
भारत सरकारने पर्यटन मंत्रालयाअंतर्गत 2014-2015 मध्ये प्रसाद योजना सुरू केली. प्रसाद योजनेचे पूर्ण रूप म्हणजे ‘तीर्थक्षेत्र कायाकल्प आणि अध्यात्मिक समृद्धी मोहीम’. धार्मिक पर्यटनाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रे विकसित आणि पुनर्जीवित करण्यावर या योजनेचा भर आहे. धार्मिक पर्यटनाचा संपूर्ण अनुभव देण्यासाठी तीर्थक्षेत्रांना प्राधान्याने, नियोजित आणि शाश्वत पद्धतीने विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. देशांतर्गत पर्यटनाचा विकास मुख्यत्वे तीर्थक्षेत्र पर्यटनावर अवलंबून आहे.