देवळाली प्रवरा (वार्ताहर)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील पठारे वस्ती येथे गुरुवार (दि. २६ मार्च) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या जादूटोणा सदृश प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी एका संशयितास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान पठारे कुटुंबियांना घराबाहेरून तंत्र मंत्र म्हणत असल्यासारखे मोठ्याने आवाज ऐकू आले. यामुळे ते जागे होऊन बाहेर आले असता, घरासमोर टाचण्या टोचलेले लिंबू, काळी बाहुली, हळद-कुंकू, दोरी, कपड्यांचे तुकडे तसेच कुऱ्हाड असे साहित्य आढळून आले. तसेच एमएच १६ बीडब्ल्यू ३११२ क्रमांकाची बुलेट दुचाकीही घटनास्थळी दिसून आली.
या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरून गेले असतानाच, ते बाहेर येत असल्याचे पाहून तीन संशयित घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, प्रसंगावधान राखत पठारे कुटुंबियांनी त्यापैकी एका संशयिताला पकडण्यात यश मिळविले. धक्कादायक बाब म्हणजे पकडलेली व्यक्ती ही पठारे कुटुंबातील जावई असल्याचे निष्पन्न झाले.
संदर्भात गोविंद पठारे रा. पठारे वस्ती, देवळाली प्रवरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल रावसाहेब लांडगे (रा. देहरे. ता. अहिल्यानगर) हा त्यांचा जावई असून तो सैन्यदलात कार्यरत आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीचा विवाह त्याच्याशी झाला होता. दरम्यान, त्यांच्या मुलीचा सासरी संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप असून याप्रकरणी संबंधिताविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात बापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक झाल्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर तो सातत्याने त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच, संशयितास पकडताना त्याने हात धरून ओढल्याने बांगड्या फुटून हाताला दुखापत झाल्याचे पठारे यांच्या पत्नीने सांगितले.
या प्रकरणी राहुरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, हा प्रकार अंधश्रद्धा की सूडबुद्धीने केलेले कृत्य, याचा सखोल तपास करून संबंधितावर अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.





