Saturday, June 13, 2026
HomeनगरDeolali Pravara : ड्रोन विरोधात पोलिसांची जोरदार मोहिम

Deolali Pravara : ड्रोन विरोधात पोलिसांची जोरदार मोहिम

राहुरी फॅक्टरी, बेलापूर व सोनगाव परिसरात सापडले ड्रोन || तीन ड्रोन पोलिसांच्या ताब्यात, सूत्रधारांचा शोध सुरू

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणार्‍या संशयास्पद आणि बेकायदेशीर उडणार्‍या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलीस यंत्रणा सतर्क होत विशेष शोधमोहीम हाती घेतल्यानंतर या ड्रोनची संख्या अचानक कमी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच राहुरी फॅक्टरी, बेलापूर आणि सोनगाव परिसरात प्रत्येकी एक असे एकूण तीन संशयित ड्रोन स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले असून ते पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून दररोज रात्री आठ ते दहा ड्रोन आकाशात फिरताना दिसत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते. तथापि, या ड्रोनचा उगम, त्यामागील सूत्रधार आणि त्यांचा नेमका उद्देश काय, याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. सोमवार, दि. 1 जून रोजी रात्री राहुरी पोलिसांनी देवळाली प्रवरा परिसरात ‘मिशन अँटी ड्रोन’ अंतर्गत विशेष तपास मोहीम राबविली. या मोहिमेत अत्याधुनिक अँटी-ड्रोन गन तसेच लेझर गनच्या सहाय्याने आकाशातील संशयास्पद हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ड्रोनची उंची, दिशा आणि हालचालींचे विश्लेषण करण्यासाठी विशेष उपकरणांचाही वापर करण्यात आला.

या मोहिमेत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस कर्मचारी सूरज गायकवाड तसेच पुणे येथील अँटी-ड्रोन पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप जगताप, जालिंदर साखरे, प्रमोद ढाकणे, सोहेल सय्यद, रियाज शेख यांच्यासह प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ढूस, चंद्रकांत कराळे आणि संतोष खाडे यांनी सहभाग घेतला. पुणे येथील विशेष पथकाने लाख-जातप शिवारातील सोमय्या फार्म परिसरात ड्रोन शोधमोहीम राबविली. यावेळी लेझर गन आणि अँटी-ड्रोन गनच्या साहाय्याने संशयास्पद उड्डाणांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवारी रात्री आकाशात दिसणार्‍या ड्रोनची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे राहुरी फॅक्टरी, बेलापूर आणि सोनगाव परिसरात प्रत्येकी एक असे एकूण तीन संशयित ड्रोन पडलेल्या अवस्थेत स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले असून ते ड्रोन नागरिकांनी पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.

प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण काही प्रमाणात कमी झाले असले, तरी या ड्रोनमागील नेमका सूत्रधार कोण, त्यांचा उद्देश काय आणि रात्रीच्या वेळीच ते उड्डाण का करत आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.तज्ज्ञांच्या मते, संबंधित ड्रोन ताब्यात घेणे किंवा निष्क्रिय करण्यात यश आल्यास त्यांच्या मालकांची ओळख आणि उड्डाणामागील हेतू स्पष्ट होऊ शकतो. दरम्यान, स्थानिक पोलिस प्रशासनाने बेकायदेशीर ड्रोनविरोधातील तपास आणि शोधमोहीम अधिक तीव्र केली असून आवश्यकतेनुसार आणखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे, ड्रोनच्या हालचाली कमी झाल्या असल्या तरी या प्रकरणाबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Jalgaon Vidhan Parishad Election : नाशिकनंतर जळगावचाही तिढा सुटला; बंडखोर रेश्मा...

0
जळगाव | Jalgaon स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीत (Jalgaon Vidhan Parishad Election) महायुतीसमोर (Mahayuti) उभे ठाकलेले बंडखोरीचे संकट अखेर टळले आहे. शिवसेना (शिंदे...