देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara
गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात दिसणार्या संशयास्पद ड्रोनची गूढता रविवारी रात्री आणखी वाढली. प्रशासनाने प्रथमच अँटी-ड्रोन यंत्रणेच्या माध्यमातून या ड्रोनचा मागोवा घेण्याचा आणि त्यांना निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला, परंतु यश मिळाले नाही. तरीही, आकाशात ड्रोन खरोखर उडत असल्याची प्रशासनास आणि नागरिकांनाही खात्री झाली आहे.
रविवार, दि. 31 रोजी रात्री पुन्हा एकदा देवळाली प्रवरा परिसरात नागरिकांच्या दृष्टीस वेगाने हालचाल करणारा संशयास्पद ड्रोन दिसला. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांना माहिती दिल्यानंतर पुणे येथील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून विशेष अँटी-ड्रोन पथक उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे देवळाली प्रवरा-त्रिंबकपूर मार्ग परिसरात राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. पुण्याहून आलेल्या अँटी-ड्रोन पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने ड्रोनचा मागोवा घेऊन त्याला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पथकातील तज्ज्ञ संदीप जगताप यांनी ड्रोन निष्क्रिय करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना केल्या, परंतु ड्रोन अत्यंत उंचीवर असल्यामुळे नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही.
या कारवाईदरम्यान पोलीस पथक आणि स्थानिक नागरिकांनी ड्रोन आकाशात फिरताना पाहिल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आणि अफवांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला असून, परिसरात प्रत्यक्ष ड्रोन उडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांचा परिसरातील चोरी किंवा इतर गुन्हेगारी कारवाईशी थेट संबंध सध्या समोर आलेला नाही. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
या मोहिमेत पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी देवळाली प्रवरा येथील प्रहार संघटनेचे आप्पासाहेब ढूस व स्थानिक नागरिक उपस्थित होते. सध्या प्रशासन सखोल तपास करत असून, हे ड्रोन कोण उडवत आहे, त्यामागचा उद्देश काय आहे आणि संबंधित यंत्रणांची परवानगी आहे का याचा शोध घेत आहे. राहुरी तालुक्यातील आकाशात फिरणार्या या रहस्यमय ड्रोनमुळे नागरिकांमध्ये उत्सुकता, संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे, आणि प्रशासनाच्या पुढील तपासातून या गूढतेवर पडदा कधी उघडतो याची प्रतिक्षा नागरिकांना आहे.




