देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara
देवळाली प्रवरा परिसरात सध्या युरिया खताचा मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. युरियाच्या गोणीसोबत इतर रासायनिक खते खरेदी करण्याची सक्ती होत असल्याने शेतकर्यांवर आर्थिक ताण वाढला असून ‘कोणी युरिया देता का युरिया’ अशी विनवणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात देवळाली प्रवरा सहकारी सोसायटीसह आठ ते दहा खाजगी कृषीसेवा दुकाने आहेत. त्यापैकी सात दुकानांना रासायनिक खत विक्रीचा परवाना आहे. मागील आठवड्यात देवळाली प्रवरा सोसायटीमध्ये 15 टन, तर सात खाजगी दुकानांमध्ये प्रत्येकी पाच टनप्रमाणे एकूण 35 टन युरिया उपलब्ध झाला होता. म्हणजेच परिसरात एकूण 50 टन युरिया दाखल झाला होता. मात्र अवघ्या सात दिवसांत हा साठा संपल्याचे सांगत दुकानांवर युरिया उपलब्ध नाही असे फलक झळकत आहेत.
पण 50 टन युरिया आठवडाभरात संपला कसा? तो गेला कुठे? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
सध्या गहू, हरभरा, कांदा, मका व ऊस या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. या पिकांच्या वाढीसाठी नत्र (नायट्रोजन) अत्यावश्यक असते आणि ते मुख्यत्वे युरियामधून मिळते. थंडीमुळे पिके जोमात असताना काही दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे नत्राची कमतरता जाणवत असून पिकांवर पिवळेपणा दिसू लागला आहे. हा पिवळेपणा दूर करण्यासाठी युरियाची तातडीची गरज आहे.
मात्र डिसेंबर 2025 पासून युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. मोठे वितरक साठा दाबून ठेवून ‘लिंकींग’ च्या नावाखाली इतर खते खरेदी करण्याची अट घालत असल्याची चर्चा आहे. सध्या एका शेतकर्याला रांगेत उभे राहून जेमतेम दोन गोण्या युरिया दिला जातो. मात्र त्या दोन गोण्या मिळवण्यासाठी त्याला नॅनो युरिया, नॅनो डीएपी किंवा इतर रासायनिक खत घेण्याची सक्ती होत असल्याचा आरोप आहे.
तसेच येथील नामांकित कंपनीच्या कृषीसेवा दुकानात दोन युरिया गोण्यांसाठी एक सल्फेटची गोणी घेणे बंधनकारक करण्यात आल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. दोन युरिया गोण्या सुमारे 540 रुपयांच्या, तर एक सल्फेटची गोणी 1100 रुपयांची असल्याने ‘नाला साठी घोडा’ घेण्यासारखा प्रकार असल्याची टीका होत आहे.
कृषी विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले की, सक्ती असल्यास ती दुकानदारांवर आहे, शेतकर्यांवर नाही. दुकानदारांकडून अशी सक्ती होत असेल तर संबंधितांनी आमच्याशी संपर्क साधावा.
दुकानदारांचे म्हणणे आहे की, आम्हाला युरिया मिळवण्यासाठी वितरकांकडून इतर रासायनिक खत खरेदीची सक्ती केली जाते. पाच टन युरियासाठी पाच टन इतर खत घ्यावे लागते. त्यामुळे आम्हालाही शेतकर्यांना युरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती करावी लागते.





