अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील 11 नगरपरिषदा व एका नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर झाला. नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून झाल्याने आता उपनगराध्यक्ष व विषयी समिती सभापतीपदी निवडीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया पुढील आठवड्यात (दि. 29 नंतर) उपाध्यक्ष व सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर करणार असून उपनगराध्यक्ष व महत्त्वाच्या समित्यांचे सभापतीपद मिळावे, यासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील पालिका निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष राहिला आहे. 12 पालिकांपैकी भाजपकडे सात, सेनेच्या शिंदे गटाकडे दोन, स्थानिक आघाड्यांकडे दोन व काँग्रेसकडे एका पालिकेत सदस्यांचे बहुमत आहे. सत्ता असणार्या आणि सत्ता नसणार्या ठिकाणी उपनगराध्यक्ष व सभापती निवडीत देखील भाजपची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यात जिल्ह्यातील भाजपचे नेते मित्रपक्ष म्हणून अजित पवार गट व शिंदेसेनेला भाजप काही वाटा देणार हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
दरम्यान, नूतन नगराध्यक्ष, नगरसेवकांची राजपत्रात नोंद होते. त्यासाठी जिल्हाधिकार्यांमार्फत शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राजपत्रात नोंद झाल्यानंतर जिल्हाधिकारी केव्हाही उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करू शकतात. ही प्रक्रिया आठवडाभरात होईल, त्यानंतर सभापती निवडीच्या प्रक्रियेला गती येईल. यावेळी मुख्याधिकारी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. संपूर्ण प्रक्रिया चित्रीकरणात पार पडेल.
सत्ताधारी गट
संगमनेर : थोरात-तांबे आघाडी, कोपरगाव : भाजप, श्रीरामपूर : काँग्रेस, राहुरी : राष्ट्रवादी गट आघाडी, देवळाली प्रवरा : भाजप, शिर्डी : भाजप, नेवासा : क्रांतीकारी पक्ष, पाथर्डी- भाजप, शेवगाव : अजित पवार गट, जामखेड : भाजप आणि श्रीगोंदा : भाजप आणि राहाता : भाजप
या समित्यांसाठी निवड
पालिकांमध्ये नगरध्यक्षपदासोबत उपनगराध्यक्ष बांधकाम, आरोग्य आणि शिक्षण अशा समित्या असून या समित्यांसाठी निवडून आलेल्या नगरसेवकांमधून अधिकृत निवडणूक होवून त्यातून या पदावरील निवडी जाहीर होणार आहे. यामुळे या निवडीत कोणत्या पालिकेत कोणत्या पक्षाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.





