मुंबई | Mumbai
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) इंदोरे गावातील दरगोडे कुटुंबातील ९ जणांचा ‘इर्टिका’ कारने घराकडे परतत असताना दिंडोरी शहरातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या विहिरीत कार कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू (Death) झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे.
हे देखील वाचा : Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे कुटुंबीयांवर काळाचा घाला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावर (Social Media) याबाबत एक पोस्ट केली असून त्यात म्हटले की, “नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जणांचा मृत्यू (Death) झाला, यात ६ विद्यार्थी आहेत. अतिशय दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी ही घटना आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मंत्री गिरीश महाजन यांच्याशी मी चर्चा केली असून त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि ते समन्वय साधून आहेत. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले आहेत.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?
मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केला जात असताना त्याच्या मधोमध विहीर आहे, हे पाहून धक्का बसतो. रस्ता बांधताना संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार काय काम करत होते? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणातील सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय रेकॉर्ड तपासले जाणार असून, हलगर्जीपणा करणाऱ्या एकाही अधिकार्याला सोडले जाणार नाही. तसेच विहीर मालकावर आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, केवळ मालकावर कारवाई करून न थांबता, रस्त्याचे नियोजन आणि बांधकाम करणाऱ्या विभागाचीही चौकशी केली जाईल. अपघातास नेमके कोण जबाबदार आहे याची देखील चौकशी करण्यात येईल आणि त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई होईल. तर भविष्यातील अपघात टाळण्यासाठी दिंडोरीतील ती विहीर तातडीने बुजवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही महाजन यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik Dindori Accident News : कार विहिरीत कोसळून नऊ जणांचा करुण अंत; दुर्घटनेनंतर मंत्री झिरवाळांना स्थानिक घेराव घालत म्हणाले “या निष्पाप…”
नेमकं काय घडलं?
दरगोडे कुटुंब एका खाजगी क्लासच्या स्नेह संमेलनासाठी दिंडोरी शहरात (Dindori City) आले होते. यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वजण आपल्या ‘इर्टिका’ कारने (एमएच १५ जेएस १०५३) घराकडे परतत होते. त्यावेळी रात्री १० वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील राजू राजे यांच्या विहिरीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, विहीर खोल आणि पाण्याने भरलेली असल्यामुळे कारचा शोध घेणे कठीण जात होते. त्यातच रात्रीचा दाट अंधार असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत होते. यानंतर घटनेची माहिती मिळाल्यावर प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने कार विहिरी बाहेर काढण्यात आली. मात्र तोपर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतांची नावे
सुनील दत्तात्रय दरगोडे (वय ३२), रेशमा सुनील दरगोडे (वय २७), आशा अनिल दरगोडे (वय ३२), गुणवती सुनील दरगोडे (वय ११), श्रेयश अनिल दरगोडे (वय ११), श्रावणी अनिल दरगोडे (वय ११), सृष्टी अनिल दरगोडे (वय १४), समृद्धी राजेंद्र दरगोडे (वय ७) श्रद्धा अनिल दरगोडे (वय १३)





