मुंबई | Mumbai
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा असून महिलांवर अत्याचर करणाऱ्या खरातकडे राजकारणी, नेते, सेलिब्रिटी हे त्याच्याकडे यायचे अशी माहिती समोर आली. त्याचे राजकीय संबंधही उघड झाले आहे. त्यातच शुक्रवारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठे खुलासे केले असून खरातचे कोणासोबत फोनवर संभाषण झाले किती वेळा झाले, किती वेळ झाले याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. याबाबतचे सीडीआरच त्यांनी समोर आणले. या सीडीआरमध्ये राज्यातील बड्या नेत्यांचे खरातसोबत किती वेळ बोलणे झाले याचे डिटेल्सही सांगितले. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव अंजली दमानिया यांनी घेतले. आता यावरुनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे.
अंजली दमानिया रॉ च्या एजंट आहे का?
अंजली दमानिया या RAW च्या एजंट आहे का? का महाराष्ट्राचे जे इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे, त्याच्या प्रमुख आहेत का? तर तसे नाही. म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय राहणार नाही. इतकी गुप्त माहिती जी आहे, ती कोणीही व्यक्तीगत माणूस देऊ शकत नाही. त्यामुळे फडणवीस यांच्या टार्गेटवर कोणीतरी आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. बाह्य शक्तीकडून जेंव्हा धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते, तेंव्हा स्वकीय सरकारच्या निशाण्यावर आहे, असेही राऊत यांनी म्हटले.
जेव्हा बाह्यशक्ती, पोलिसांकडून नाही, बाह्यशक्तींकडून शासकीय, गोपनीय माहिती जेव्हा जनतेपर्यंत, लोकांपर्यंत दिली जाते प्रसिद्धीमाध्यमांना, याचा अर्थ सरकारमधल्या लोकांच्या निशाण्यावर स्वकीय आहेत, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला.
उद्धव ठाकरेंना सुनेत्रा पवारांचा फोन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नक्कीच काल उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. बारामती पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा केली. मात्र, काय चर्चा केली आणि काय निर्णय घेणार यावर उद्धव ठाकरे स्वत: पत्रकार परिषद घेतील, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. काँग्रेसशी मी चर्चा केली, त्यांच्याकडे सुद्धा 4-5 उमेदवार इच्छुक आहेत, आत्ता उद्धव ठाकरे हेच यावर निर्णय घेतील. महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यायचा असेल तर एक पक्ष निर्णय घेऊन शकत नाही. काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेल आणि मगच आम्ही निर्णय घेऊ, असेही राऊत यांनी म्हटले.





