नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
आयपीएल स्पर्धेमध्ये आज (शनिवारी) डबल हेडर सामने होणार असून, दुपारी ३.०० वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) आणि सायंकाळी ७.३० वाजता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामना नवी दिल्ली येथील अरूण जेटली मैदानावर खेळविला जाणार आहे.
मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द ६ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय संपादन करण्याची संधी त्यांच्याकडे असणार आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर सलामीच्या सामन्यात ६ गडी राखून विजय संपादन केला आहे. त्यामुळे आपली विजयी लय कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांना कडवी लढत देण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३७ सामने खेळले गेले असून, मुंबई इंडियन्सने १९-१६ आशा फरकाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच दिल्ली येथील अरूण जेटली मैदानावर १२ सामने खेळले असून, दिल्ली कॅपिटल्सने ७-५ फरकाने बाजी मारली आहे. दिल्ली कॅपिटल्सने अरूण जेटली मैदानावर ८५ सामने खेळले असून, ३८ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर ४५ सामने गमावले आहेत.
तर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (Gujarat Titans vs Rajasthan Royals) ८ सामने खेळले गेले असून, राजस्थान रॉयल्सने २ तसेच गुजरात टायटन्सने ६ सामन्यात विजय संपादन केला आहे. गुजरात टायटन्स संघाला पंजाब किंग्ज विरूध्द सलामीच्या सामन्यात ३ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज असणार आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने सलामी सामन्यात ८ गडी राखून चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करून यंदाच्या आयपीएल स्पर्धेमध्ये विजयी सलामी दिली आहे.त्यामुळे स्पर्धेतील आपला दुसरा विजय संपादन करण्याची संधी राजस्थान रॉयल्सकडे असणार आहे. अखेरच्या ५ सामन्यांचा निकाल बघितल्यास गुजरात टायटन्सने ३ तर राजस्थान रॉयल्सने २ सामन्यात विजय संपादन केला आहे.





