Saturday, November 9, 2024
Homeदिवाळी अंक २०२४सह्याद्रीमधील गवताळ प्रदेश संवर्धनाची गरज - डॉ. कुमार गोसावी - वनस्पती शास्र...

सह्याद्रीमधील गवताळ प्रदेश संवर्धनाची गरज – डॉ. कुमार गोसावी – वनस्पती शास्र विभाग, एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स कॉलेज

गवताच्या तृणात, विठोबा दिसतो,
सर्वत्र त्याचीच छाया, भक्तीने ओळखतो
या संतांच्या शिकवणीप्रमाणे गवताच्या प्रत्येक पात्यामध्ये विठुरायाचे रूप दिसते. यात गवत आणि विठोबा यांना एकत्रित म्हणजेच निसर्गातच देव आणि देवतांमध्ये निसर्ग बघण्याची दृष्टी आपल्याला संतांनी दिली आहे. खरेतर गवत आणि गवतवर्गीय वनस्पती या आपल्या आहारातील महत्त्वपूर्ण घटक असून अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधे, तसेच जैवविविधतेच्या अस्तित्वासाठीही सह्याद्रीच्या कुशीतीले विविध जातींचे गवत आणि गवताळ प्रदेशांचे जतन, संवर्धन करणे गरजेचे आहे.

गवताळ प्रदेश हे पृथ्वीवरील एक महत्त्वाचे आणि विविधतेने भरलेले पर्यावरणीय क्षेत्र आहे. या प्रदेशांत विस्तीर्ण गवताचे मैदान, विविध प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आढळतात. गवताळ प्रदेशांमध्ये मुख्यत्वे वेगवेगळ्या गवतांचा प्रजाती आणि काही झुडपे आढळतात. या प्रदेशांमध्ये मोकळ्या हवामानामुळे शेतीसाठी उपयुक्तता असते आणि ते पर्यावरणाच्या संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात.

- Advertisement -

गवताळ प्रदेशांमध्ये आढळणारे गवत आणि वनस्पती मातीची धूप रोखण्याचे आणि जैवविविधतेचे संंगोपन करण्याचे महत्त्वाचे काम करतात. या प्रदेशांमध्ये आढळणारे प्राणी, पक्षी आणि कीटक विविध प्रकारच्या वनस्पतींवर अवलंबून असतात. गवताळ प्रदेशांमध्ये पाण्याचे स्रोत कमी असतात. त्यामुळे येथील वनस्पती आणि प्राणी कमी पाण्यावर तग धरू शकतात.


पृथ्वीचा बर्फाच्छादित भाग वगळता साधारणतः २४ टक्के भागावर गवताळ प्रदेशांचा विस्तार आहे. यात नैसर्गिक, मानवनिर्मित आणि मिश्र स्वरूपातील गवताळ प्रदेशांचा समावेश होतो. गवताळ प्रदेश ही एक महत्वाची आणि मोठी परिसंंस्था मानली जात असली, तरी गेल्या काही दशकांमध्ये प्राण्यांची शिकार, जंगलतोड, शहरी विस्तार, जनावरांची अतिचराई, कृत्रिम आग, कीटकनाशके आणि रसायने यांचा अतिवापर, गवताळ प्रदेशाचे लहान- लहान तुकड्यांमध्ये विभाजन अशा मानवी हस्तक्षेपामुळे गवताळ प्रदेशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

चराऊ जमीन किंवा कुरण म्हणजेच जमिनीचा असा भाग जिथे ८० टक्क्यांपेक्षा जास्त गवतवर्गीय वनस्पती, त्याचबरोबर काही प्रमाणात लव्हाळावर्गीय वनस्पतींनी व्यापलेला असतो. पृथ्वीवरील जमिनीचा सुमारे २४ टक्के भाग गवताळ प्रदेश आहे आणि भारतामध्ये साधारण १७ टक्के गवताळ प्रदेश म्हणून गणला जातो. यापैकी ५ टक्क्यांपेक्षा कमी प्रदेश संरक्षित करण्यात आलेला आहे.पृथ्वीवरील बहुतांश प्राणी हे शाकाहारी आणि मिश्राहारी प्रकारात गणले जातात. तर उरलेले मांसाहारी प्राणी, शाकाहारी प्राण्यांवर जगत असल्याने पृथ्वीवरील प्राणिजीवन गवतांशिवाय अशक्यच!.

मानवी जीवन सुजलाम् आणि सुफलाम् होण्याचे कारणही गवतच. दैनंदिन आहारामध्ये प्रथिने आणि कर्बोदके मिळवण्याचे प्रमुख स्रोत म्हणजे गवतच. ७५ टक्केपेक्षा जास्त लोकसंख्येची अन्नाची गरज भात, गहू आणि मका हे महत्त्वाचे तीन गवत भागवतात. यावरूनच कळते की गवत मानवी जीवनात फार महत्त्वाची भूमिका बजावतात. लागवडीखाली आणलेल्या वनस्पतींच्या प्रजातीचा आणि त्यांचा उत्पत्ती केंद्रांचा सखोल अभ्यास निकोलाय वाव्हिलॉव या रशियाचा शास्त्रज्ञाने इ. स. १९२४ ते १९३५ पर्यंत केलो. शेवटी १९३५ मध्ये त्यात बदल करून त्यांनी पिकांची आठ मुख्य उत्पत्ती केंद्रे असल्याचे स्पष्ट केले. यात भारताचा भू-भाग हा दोन प्रमुख केंद्रात विभागला गेला आहे. त्यात:

१. मध्य आशियाई केंद्र : यात वायव्य भारत (पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत आणि काश्मीर), अफगाणिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान आणि पश्चिम चीन यांचा समावेश आहे.
२. भारत/ हिंदोस्तान : यात मुख्य केंद्र (भारत) : आसाम, बांगलादेश आणि बर्मा समाविष्ट आहे, परंतु वायव्य भारत, पंजाब किंवा वायव्य सरहद्द प्रांत वगळून भारत/ हिंदोस्तान या मुख्य केंद्राचे पुन्हा दोन उपकेंद्रांमध्ये विभागणी केली जाते.
अ) इंडो-बर्मा उपकेंद्र : यामध्ये आसाम, बांगलादेश आणि बर्मा म्हणजेच आत्ताचे म्यानमार, या प्रदेशांचा समावेश होतो.
ब) सियाम-मलया-जावा उपकेंद्र : यात इंडो-मलया सेंटर, इंडो-चीन आणि मलय द्वीपसमूह समाविष्ट आहे.
तब्बल दोनशेपेक्षा जास्त पिकांचा उत्क्रांती केंद्र हे भारत आणि त्याच्या लगतचे देश आहेत. यापैकी ९ वनस्पती या गवतवर्गीय असून यांचा नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा सहा हजारपेक्षा जास्त उप-प्रजाती अस्तिवात आहेत. गवतवर्गीय पिकांमध्ये मुख्यत्वे भात, ऊस, वैजयंती, गहू, वरई , सावा , बाम्बू , नाचणी यांचा समावेश होतो. यात भात हा अग्रगण्य पिकांमध्ये गणला जातो.


भारताच्या भौगोलिक परिस्थितीत विविधता असल्याने जैवविविधता आढळून येते. भारतामध्ये जैवविविधतेचे चार प्रमुख केंद्रे आहेत. दुर्दैवाने हे चारही केंद्रे हॉटस्पॉट म्हणून घोषित केलेले आहेत. ज्या मेगा बायोडायव्हर्सिटीमध्ये जगाच्या ०.५ टक्के प्रदेशानिष्ट प्रजाती आढळतात आणि माणसाच्या हस्तक्षेपाने ७० टक्के प्रजातींचा अधिवास लोप पावलेला आहे, अशा मेगा बायोडायव्हर्सिटीला हॉटस्पॉट म्हणून घोषित केले जाते.

भारतातील चार प्रमुख जैवविविधतेचे केंद्रांपैकी पश्चिम घाट हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. पश्चिम घाटातील पूर्वेकडचा भाग हा सह्याद्री पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अधिवास निर्माण झाले आहेत आणि अशा अधिवासमध्ये वनस्पतींची विविधता आढळून येते. सह्याद्री पर्वतरांगांवरती जांभा दगडाचे पठार हे वैशिष्ट्यपूर्ण अधिवास बघायला मिळते. जांभा दगडाचे पठार म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरांवरती सपाट भूभाग. या पठारांवर अतिप्रमाणात पाऊस आणि अतिप्रमाणात ऊन असल्याने वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती प्रजातींची उत्क्रांती झालेली आहे. त्यात जास्त प्रमाणात गवतवर्गीय वनस्पती आहेत. हे जांभा दगडाचे पठार म्हणजे सह्याद्री पर्वतरांगावरील प्रदेशानिष्ठ वनस्पतींचे बेटच!. असे पठार म्हणजे नाविन्यपूर्ण गवतांचे कुरणच. या पठारांवरती वेगवेगळ्या गवताच्या प्रजाती आणि काही गण हे प्रदेशानिष्ठ (जी प्रजाती एखाद्या प्रदेशाव्यतिरिक्त कुठेही आढळत नाही अशा प्रजातीला प्रदेशानिष्ठ प्रजाती म्हणतात) आहेत. त्यापैकी डायकॅन्थियम , डायमेरिया, अरुंडिनेला ह्या गणांच्या प्रजातींचा जास्त समावेश होतो.

काही भरड धान्यांच्या प्रजातींचाही शोध अशा पठारांवरून लागलेला आहे. काही गणांमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त प्रजाती असून पूर्ण गणच या पठारांवरती प्रदेशानिष्ठ आहेत. जांभा दगडांचे पठार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जांभा दगडांच्या पठारांचे गवताचे कुरणांचे संवर्धन करणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण या पठारांवरच्या वनस्पतींवर विविध प्राणी आणि अन्नसाखळ्या अवलंबून असतात. विकसित देशाचे मूलमंत्र हे त्याच्या अर्थव्यवस्थेवर नसून त्या देशाच्या नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य वापर आणि त्यांचे संवर्धन या गोष्टींवर अवलंबून असतो.

गवताळ प्रदेशांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, गवताळ प्रदेशांवरील अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवणे, पर्यावरणीय उपक्रम राबविणेे आणि स्थानिक समुदायांना जागरूक करणे आवश्यक आहे. गवताळ प्रदेशांचे संरक्षण हे आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. आपल्याला नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करता आला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणीय संतुलन राखता येईल. येणार्‍या पिढ्यांसाठी स्वच्छ पर्यावरण आणि समृद्ध नैसर्गिक संसाधने टिकून ठेवण्याचे दायित्व आपल्यावर आहे. म्हणून, गवताळ प्रदेशांचे त्याचबरोबर नैसर्गिक स्त्रोतांचे संरक्षण हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.

डॉ. कुमार गोसावी – वनस्पती शास्र विभाग, एचपीटी आर्ट्स अँड आरवायके सायन्स कॉलेज, नाशिक

निलेश अप्पासो माधव – संशोधक विद्यार्थी


वनस्पती शास्त्र विभाग
,

एचपीटी

आर्ट्स

अँड

आरवायके

सायन्स

कॉलेज
,
नाशिक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या