नाशिक । प्रतिनिधी Nashik
उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ‘देशदूत’ आयोजित तसेच ‘ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ प्रस्तुत प्रायोजित ‘नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक अध्यक्ष दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक उपाध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा, संचालक नितीन खोले, गोविंद दंडे अँड सन्स प्रा. लि. संचालक योगेश्वर दंडे, ए.सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक ऋषभ जैन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून एक्स्पोचे उदघाटन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू झाला. ‘देशदूत’चे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी प्रास्ताविक केले.
पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे आयोजन नाशिकरोड, जेलरोड येथील मनपा आरक्षित नियोजित नाट्यगृह जागेच्या मोकळ्या भूखंडावर करण्यात आले आहे. त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे २८ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. मान्यवरांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणाऱ्या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले. तसेच स्टॉलला भेट देत स्टॉलधारकांशी संवाद साधला. प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (दि. २ फेब्रुवारी) दुपारी 2 ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणारआहे.गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट द्यावी, देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी देशदूतचे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य, कॉर्पोरेट व्यवस्थापक संदीप राऊत, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर आनंद कदम, भगवंत जाधव, समीर पाराशरे, विशाल जमधडे, प्रशांत अहिरे, यांनी परिश्रम घेतले. वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले तर आभार नाशिकरोड प्रतिनिधी दिगंबर शहाणे यांनी मानले.
‘देशदूत’ प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक नाशिकरोड येथील गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसायात कार्यरत असलेले प्रसिद्ध ए. सी. जैन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आहेत. तसेच फायनान्शिअल पार्टनर नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक तर पर्यावरणीय पार्टनर पपायाज नर्सरी हे आहेत. २ फेब्रुवारीपर्यंत दररोज दुपारी 2 ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांना प्रवेश खुला आहे. नागरिकांनी ‘देशदूत’ आयोजित नाशिकरोड प्रॉपर्टी एक्स्पोला अवश्य भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अनेक बांधकाम व्यावसायिकांना व्यासपीठ मिळाले असून, हक्काचे घर घेणाऱ्या नागरिकांना यानिमित्ताने उत्तमोत्तम आणि बजेटनुसार घर निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. ग्राहकांना या प्रदर्शनाचा नक्कीच फायदा होणार आहे. ‘देशदूत’च्या माध्यमातून होणारा हा उपक्रम प्रशंसनीय असा आहे.
-दत्ता गायकवाड
नाशिकरोडच्या विकासात नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या विभागाचा सर्वांगीण विकास होण्यास बँकेची मोठी मदत झाली आहे. देशदूतने आयोजित केलेले प्रॉपर्टी प्रदर्शन कौतुकास्पद असून, अनेकांना घर घेण्यास यामुळे मदत होणार आहे.
-प्रशांत दिवे
‘देशदूत’ने प्रदर्शनाचे आयोजन अतिशय उत्तम प्रकारे केले असून नाशिकरोड परिसरातील अनेक गृह व व्यावसायिक दर्जेदार प्रकल्पांची माहिती याद्वारे ग्राहकांना निश्चितच मिळण्यास मदत होईल. नागरिकांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
-ऋषभ जैन










