मुंबई / प्रतिनिधी Mumbai
सत्तेवर बसल्यानंतरही भाजप अजून विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर पडलेला नाही. तर काँग्रेसला अजूनही विरोधी पक्षाची भूमिका कशी बजवायची हे समजलेले नाही. सत्ता केवळ खुर्चीत नसते, ती अंगात आणि मनातही असावी लागते. सत्ताधाऱ्यांनी आपल्यावरील टीका आणि विनोद खिलाडूवृत्तीने स्वीकारायला शिकले पाहिजे. मात्र, आज व्यंगचित्रकार, पत्रकार आणि संपादकांवर बंधने आणली जात आहेत. हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी येथे केली.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्यावरील व्यंगचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात राज ठाकरेंनी पुलंच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांनी सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.
भाजपने संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काढलेल्या रॅलीवर राज ठाकरे यांनी मिश्किल शब्दात टिप्पणी केली. भाजपने लोकशाही वाचवा असे म्हणणे म्हणजे केंटुकी फ्राइड चिकनचे प्रतीक असलेल्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा असे सांगण्यासारखे आहे, असा टोला त्यांनी लगावला. स्वत:च सत्तेत बसलेले असताना लोकशाही वाचविण्यासाठी मोर्चे नेमके कशासाठी आणि कोणाविरुद्ध काढत आहात, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
विधान परिषद निवडणूक निकालाचा अंदाज चुकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले, मी आजवर कोणत्याच पंतप्रधानांनी असे ट्विट केल्याचे पाहिले नाही. कारण भाजप अजूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेतूनच बाहेर आलेला नाही. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय शैलीचाही दाखला दिला. बाळासाहेबांवर अनेक पत्रकार आणि संपादकांनी टीका केली. मात्र, त्यांनी प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर दिलेच असे नाही. टीका करणारा प्रत्येकजण आपला शत्रू नसतो. तर तो आपली भूमिका मांडत असतो, हे समजून घेण्याची गरज आहे. टीकेला कसे सामोरे जायचे हे सत्ताधाऱ्यांनी ठरवायला हवे, असे राज ठाकरे म्हणाले.
व्यंगचित्रामुळे वर्तमानपत्रातून काढून टाकण्यासारख्या घटना घडत असतील, तर ही चिंतेची बाब आहे, असे सांगत बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर व्यंगचित्र काढून त्यांनाच ते पाठवले होते. नेहरू यांनी त्यावर आपली सही देऊन बाळासाहेबांना शुभेच्छा दिल्या होत्या, अशी आठवण राज यांनी सांगितली. त्यामुळे व्यंगचित्रकार, पत्रकार किंवा संपादक हे कोणाचे शत्रू नसतात. ते केवळ आपापली भूमिका मांडत असतात. त्यांचे म्हणणे समजून घेण्याची आणि त्यावर खिलाडूवृत्तीने प्रतिक्रिया देण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांमध्ये असली पाहिजे. परंतु, गेल्या दहा-बारा वर्षांत व्यंगचित्रकार आणि पत्रकारांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा आणण्याचे जे प्रकार सुरू झाले आहेत, ही संस्कृती विचित्र आणि घाणेरडी आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.




