मुंबई । Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. यानंतर विरोधकांनी हा विजय मान्य नसल्याचे सांगत ईव्हीएमविरोधात आंदोलने केली आहेत. भाजपसह महायुतीला विधानसभेत 230 जागा मिळाल्या. तर, महाविकास आघाडीला फक्त 46 जागा मिळाल्या.
यावर विरोधकांनी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचे सांगत आता बलेट पेपरवर निवडणूक घ्या, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील पत्रकार परिषद घेत आकडेवारी मांडली. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीनेच उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा.”
याचबरोबर, “2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या”, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल, असे म्हटले आहे. तसेच, शरद पवारांनी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देण्याची अपेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
पराभवाचे विश्लेषण करताना शरद पवार म्हणाले, “महाविकास आघाडी यापुढील काळातही एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार आहे. पराभव झाला म्हणून नाउमेद व्हायचे नसते. निवडणुकीला काही पर्याय नसतो. मी आयुष्यात 14 वेळा निवडणूक लढलो, मला कधीही पराभव पाहावा लागला नाही. पण यावेळेला राज्यात आम्हाला पराभव पाहायला मिळाला. जरी पराभव आला तरी चिंता करायची नसते. लोकांमध्ये जावे लागते आणि लोक चिंताग्रस्त आहेत, असे आम्हाला दिसते. लोकांमध्ये उत्साह दिसत नाही. निवडणूक झाल्यानंतर एक उत्साह दिसतो, तो मात्र यावेळेला दिसत नाही.”
शरद पवार पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाला 80 लाख मते पडली आणि त्यांचे फक्त 16 आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला 79 लाख मते मिळाली आहेत, तर त्यांचे 57आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास 41 आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते 72 लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त 10 आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 58 लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे 41 आमदार निवडून आले आहेत.”