नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Simhastha Kumbhmela २०२७) च्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांमधील विस्कळीतपणा, नियोजनाचा अभाव आणि सुरक्षेतील त्रुटींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार देवयानी फरादे व सीमा हिरे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांची भेट घेऊन विविध तक्रारी मांडल्या. तसेच एका आठवड्यात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
दरम्यान, येत्या आठ दिवसांत सुधारणा करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. शहरातील (City) अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असताना माहिती फलक न लावणे, ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने खोदकाम तसेच विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव यामुळे एकाच रस्त्याचे वारंवार खोदकाम होत असल्याचे निदर्शनास आले. काँक्रिट रस्त्यांच्या कामांमध्ये महावितरणच्या वीज तारा भूमिगत करण्याचे नियोजन नसल्याने भविष्यात पुन्हा खोदकाम करावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
गटार, पाणीपुरवठा आदी विभागांमध्ये समन्वय नसल्याने कामांची पुनरावृत्ती होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना न केल्याने अपघात होऊन दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची बाबही आमदारांनी (MLA) मांडली. रस्ते अचानक बंद करणे, पर्यायी मार्गांची व्यवस्था नसणे तसेच अपूर्ण कामे दीर्घकाळ प्रलंबित ठेवणे यामुळे वाहतूककोंडी आणि नागरिकांची गैरसोय वाढली आहे. खड्डे भरताना तांत्रिक नियमांचे पालन न केल्याने पावसाळ्यात रस्ते पुन्हा खराब होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे नागरिकांचा रोष लोकप्रतिनिधींवर व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने सुधारणा कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
आठ दिवस द्या : आयुक्त
दरम्यान, आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्व तक्रारींची दखल घेत आठ दिवसांत आवश्यक सुधारणा करून सविस्तर सादरीकरण करण्याचे आश्वासन दिले. संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
शहर अभियत्यांवर रोष
कामांचे चोख नियोजन न झाल्याने संतप्त झालेल्या आ. फरादे यांनी मनपा शहर अभियंता यांना दोषी ठरवले आहे. महत्त्वाचे पद असताना त्यांनी पूर्ण नियोजन करूनच कामांना सुरुवात करणे अपेक्षित होते, मात्र तसे न झाल्याचे सांगितले.
महापौर गैरहजर
देशासह राज्य व मनपात देखील भाजपची सत्ता आहे, असे असले तरी शहरातील भाजपच्या दोन्ही महिला आमदारांनी मनपात येऊन आयुक्तांची भेट घेतली, मात्र यावेळी भाजपच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके उपस्थित नव्हत्या. त्यामुळे चर्चा रंगली होती. यावर आ. फरांदे यांनी महापौर त्यांचे काम करत आहे तर आम्ही आमचे असे सांगितले. दरम्यान, बैठक सुरू असताना भाजप नगरसेवक आयुक्तांच्या दालनाबाहेर असताना त्यांना आतमध्ये बोलवण्यात आले नाही.





