मुंबई । Mumbai
पश्चिम आशियातील इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होत असून, भारतातही इंधन आणि गॅस दरवाढीवरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. गॅस आणि इंधनाच्या तुटवड्याबाबत माध्यमांनी चुकीची माहिती देऊन जनतेमध्ये घबराट (पॅनिक) निर्माण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकारने देशाच्या ‘एनर्जी सिक्युरिटी’ (ऊर्जा सुरक्षा) संदर्भात अत्यंत ठोस पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात झालेल्या ६० रुपयांच्या वाढीबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जागतिक स्तरावर युद्धाचा परिणाम होत असला तरी, भारताकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशात इंधनाची कोणतीही कमतरता नाही. भारत सरकारने यापूर्वीच स्पष्टीकरण दिले असून इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे. विनाकारण भीतीपोटी साठा करणे टाळावे, असेही त्यांनी नमूद केले. भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.
दुसरीकडे, कमर्शियल एलपीजी गॅसच्या दरात अचानक १५० ते २०० रुपयांची वाढ झाल्याने हॉटेल उद्योगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. घरगुती गॅस दरातही ६० रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे, विशेषतः गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पुण्यासारख्या शहरात महिलांनी वाढत्या महागाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गॅससोबतच तेल, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत असल्याने दैनंदिन खर्च भागवणे कठीण होत असल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत. काही भागात गॅस एजन्सीकडून वेळेवर पुरवठा होत नसल्याचेही समोर आले आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली ही आव्हाने असली तरी, सरकारने जनतेला धीर दिला आहे. गॅस सप्लाय काही शहरांत बंद पडल्याच्या चर्चांना मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहे. माध्यमांनी जबाबदारीने वृत्तंकन करावे आणि वास्तव परिस्थिती जनतेसमोर ठेवावी, जेणेकरून जनतेचा गोंधळ उडणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.




