मुंबई | Mumbai
अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतील राहत्या घरात चाकू हल्ला करण्यात आलाय. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या या हल्लेखोराची चाहूल लागताच महिला कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर सैफ अली खान याने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. हल्लेखोर आणि सैफ अली खान या दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. यामध्ये सैफ अली खानवर अनेक वार झाले. पैकी दोन वार अतिशय गंभीर स्वरुपाचे होते. या हल्ल्यानंतर सैफ जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. आता यावर मुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालाय. याप्रकरणी कारवाई होते आहे. पोलिसांनी तुम्हाला याबाबत सगळी माहिती दिली आहे. कोणत्या मोटोने त्यांच्या घरात आरोपी घुसले होते? हे तुम्हाला कळले असेल पोलीस वेळोवेळी माहिती देत आहेत.
मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणे योग्य नाही, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच विरोधकांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. “मला असे वाटते की देशातील मेगासिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरे आहे की, कधीकधी काही घटना घडतात. त्याला गंभीरतेने देखील घेतले पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही. याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण मुंबई अधिक सुरक्षित राहायला पाहिजे या दृष्टीने सरकार नक्की प्रयत्न करेल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, सिने विश्वातील सेलिब्रिटी, राजकारणातील मंडळी, नेते लीलावती रुग्णालयात जाऊन सैफ अली खानची भेट घेत आहेत. सैफ अली खानच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. तसेच या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत आहेत. सैफ अली खानची प्रकृती आता स्थित असून, उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.
नेमके हल्ला कसा घडला?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरी पहाटेच्या सुमारास चाकू हल्ला झाला. यात तो गंभीर जखमी झाला. यामुळे त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, काल रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसला आणि त्याच्या घरातील कर्मचाऱ्याशी वाद घातला. तेव्हा त्याने सैफ अली खानसोबत झालेल्या झटापटीत हल्ला करत त्याला जखमी केले. ही घटना पहाटे २ ते २.३० च्या दरम्यान घडली.
दरम्यान, सैफ अली खानच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा वांद्रे पोलिस, मुंबई गुन्हे शाखा तपास करत आहेत. पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सध्या सुरु असलेल्या तपासाबाबत बोलताना सांगितले की, घरात घुसलेला हल्लेखोर सुरक्षा भेदून आता आला. सैफच्या फ्लॅटमध्ये हल्लेखोराने कसा प्रवेश केला? हे शोधण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. हल्लेखोराने चोरीचा प्रयत्न केला होता की त्याचा दुसरा काही हेतू होता? याचादेखील तपास केला जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा