Monday, October 14, 2024
HomeराजकीयDevendra Fadnavis meet Uddhav Thackeray : फडणवीस स्वत: गाडी चालवत 'मातोश्री'वर गेले,...

Devendra Fadnavis meet Uddhav Thackeray : फडणवीस स्वत: गाडी चालवत ‘मातोश्री’वर गेले, ठाकरेंशी दोन तास चर्चा?; वंचित दाव्याने खळबळ

मुंबई | Mumbai

राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन्ही बाजूनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान या सगळ्या गोष्टी सुरू असताना राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिल्याचा दावा केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी ‘एक्स’वर व्हिडिओ शेअर करत यासंबंधी दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

मोकळे यांच्या दाव्यानुसार, शिवसेना खासदार संजय राऊत हे २५ जुलै रोजी रात्री दोन वाजता ७ डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच मातोश्री बंगला येथे गेले, दोन तास त्यांची बैठक झाली, असा आरोप सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते. जाताना सोबत कोण कोण होतं, तिथे जाऊन त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या आणि काय काय ठरलं, हे त्यांनी जनतेला सांगावं, असं आवाहन सिद्धार्थ मोकळे यांनी केलं.

वंचित बहुजन आघाडीला प्राप्त झालेली माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. कारण लोकसभा निवडणुकीत आरक्षणवादी असलेल्या मतदारांनी भाजपविरोधात मतदान केले होते. गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. पुन्हा तसे काही झाल्यास जनतेची फसवणूक होऊ नये यासाठी आम्ही सगळी माहिती, जनतेसमोर मांडत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने अशावेळी दावा केला आहे, जेव्हा शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरवणार असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपा आणि शिंदे गट जाणीवपूर्वक अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून ते स्वत:हून महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील, अशी रणनीती आखण्यात आल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नाशिकमध्ये बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे काही माहिती असेल. ती माहिती त्यांनी जनतेसमोर आणली आहे. मागील निवडणुकीत संविधान आणि आरक्षणवादी मतदारांची फसवणूक झाली आहे. ती फसवणूक पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी ही माहिती सांगितल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या