Monday, October 19, 2026
HomeराजकीयDevendra Fadnavis : मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल; नागपुरमध्ये Gen...

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहा, लोकशाही संधी देईल; नागपुरमध्ये Gen Z समोर देवेंद्र फडणवीसांचा संघर्षाचा उलगडा

नागपूर । Nagpur

भारताच्या लोकशाहीची खरी ताकद ही सामान्य नागरिकाला सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचण्याची संधी देण्यात आहे. एखाद्या तरुणाने मनात ठाम निर्धार केला आणि सातत्याने मेहनत घेतली, तर मुख्यमंत्री होण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित ‘मंथन फॉर युवा’ या कार्यक्रमात जेन झीसोबत संवाद साधताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अनेक अनुभव आणि संघर्षांची आठवण सांगितली.

- Advertisement -

कार्यक्रमादरम्यान उपस्थित तरुणांकडून फडणवीस यांना नेतृत्व, यश, जबाबदाऱ्या आणि राजकारणातील दबाव यासंदर्भात विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख करत तरुणांना ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्या देशाच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान संधी दिली आहे. त्यामुळे कधीकाळी नगरसेवक होण्याचाही विचार न केलेला कार्यकर्ता मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचू शकतो. त्यांनी भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा उल्लेख करत सांगितले की, सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीलाही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. हीच भारतीय संविधानाची आणि लोकशाहीची सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सत्तेच्या अपेक्षेने नव्हे, तर विचारांनी प्रेरित होऊन केल्याचे सांगितले. त्या काळात आपण विरोधी पक्षात काम करत आंदोलने आणि जनतेचे प्रश्न मांडणे हेच आपले ध्येय असल्याचे वाटत होते. मात्र जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे टप्प्याटप्प्याने जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि अखेर मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली, असे त्यांनी सांगितले. राजकारणातील वाढत्या जबाबदाऱ्या आणि त्यातून निर्माण होणारा दबाव कसा हाताळता, या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, त्यांनी राजकारणाला कधीही व्यवसाय म्हणून पाहिले नाही. त्यांच्या मते राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे पदापेक्षा कामाला अधिक महत्त्व दिल्यास दबाव कमी जाणवतो, असे त्यांनी सांगितले.

आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात विद्यार्थी चळवळीपासून झाल्याचे सांगताना त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावण्याच्या आंदोलनाची आठवण करून दिली. त्या वेळी आपण अवघे १८ वर्षांचे होतो. हजारो विद्यार्थ्यांसह जम्मू-काश्मीरमध्ये गेले असता प्रशासनाने रोखल्याचे, अटक झाल्याचे आणि नंतर आंदोलन सुरूच ठेवल्याचे त्यांनी सांगितले. देशासाठी काम करण्याची प्रेरणा याच काळात अधिक दृढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.

फडणवीस यांनी पुढे सांगितले की, वयाच्या २०व्या वर्षी रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान ते उत्तर प्रदेशात गेले होते. त्या काळात आंदोलनाच्या वेळी लाठीमार, गोळीबार आणि अटक अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. काही दिवस कारावासही भोगावा लागला. या अनुभवांनी मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम बनण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

संवादाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित तरुणांना मोठे स्वप्न पाहण्याचे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. लोकशाही व्यवस्थेत कोणताही तरुण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर नेतृत्वाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पदापेक्षा समाजासाठी काम करण्याची वृत्ती, सातत्यपूर्ण परिश्रम आणि ध्येयाप्रती प्रामाणिकपणा यांमुळेच यश मिळते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

हार्वेस्टरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

0
पुनदखोरे | वार्ताहर कळवण तालुक्यातील हुंड्यामोख (गणोरे ) शिवारात सोयाबीन काढणी सुरू असताना हार्वेस्टर यंत्रात अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ओम...