मुंबई | Mumbai
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मंत्री धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असतांना त्यांच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदीचा मोठा घोटाळा (Scam) झाला, असा आरोप आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेत केला होता. त्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी माध्यमांशी संवाद साधत या आरोपांना प्रत्युत्तर देत दमानियांचे आरोप सनसनाटी निर्माण करणारे आणि धादांत खोटे आहेत, असे म्हणत फेटाळून लावले आहेत.
यावेळी बोलतांना मंत्री मुंडे म्हणाले की,”मला बदनाम केले जात आहे. आज ५८ वा दिवस असून माझ्यावर मिडीया ट्रायल सुरू आहे, हे कोण करत आहे माहिती नाही. अंजली दमानिया यांनी बीड जिल्हा (Beed District) आणि येथील लोकांना बदनाम करण्याचे प्रयत्न केला असून त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले आहेत. मात्र, त्यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही. अंजली दमानिया यांना राजकारणात पुन्हा यायचे असेल. त्यामुळे स्वत:ची न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी अंजली दमानिया अशाप्रकारे आरोप करत आहेत का, हे बघितले पाहिजे.दमानिया यांचे हे आरोप धादांत खोटे असून आम्ही शांत बसलो आहोत, असे कोणीही समजू नये. आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही, असा समज कोणीही करुन घेऊ नये”, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
पुढे ते म्हणाले की,” ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला, त्या निविदा प्रक्रिया (Tender Process) सरकारच्या नियमांना धरुनच मार्च २०२४ मध्ये राबविण्यात आलेली आहे. मात्र, तरीही गेल्या ५८ दिवसांपासून अंजली दमानिया माझ्यावर वेगवेळे आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दमानिया यांनी असाच एक आरोप केला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की काही आरोपींचा मर्डर झाला. अशा प्रकारचे सनसनाटी निर्माण करण्यासाठी त्या आरोप करतात आणि स्वत:ला प्रसिद्धी मिळवतात. यामधून दुसऱ्यांना बदनाम करण्याच्या पलिकडे दुसरे कीहीही नाही”, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले.
तसेच “दमानिया यांनी युरिया आणि एमएपी नॅनो खतासंदर्भात जे आरोप केले आहेत, ते वापरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. खतांची खरेदी करण्यात आलेली इक्को कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहे. याच कंपनीकडून ड्रोनच्या माध्यमातून १ एकर शेत सात मिनिटांत फवारुन दिले जाते. दीड एकर क्षेत्रात कापसावर फवारणी करायला दोन माणसे लागतात, त्यासाठी दीड दिवस जातो. औषधासाठी १६०० रुपये खर्च येतो.मजुरी आणि पंपाचं भाडं वेगळे असते. पण नॅनो वापरुन सात मिनिटांत १ एकर शेतात फवारणी होते, त्यामुळे वेळ वाचतो आणि याचा खर्च फक्त ६०० रुपये इतका आहे. नॅनो फवारणीत फक्त २० टक्के खत खाली पडते. त्यामुळे जमीन प्रदुषित होत नाही, खताची सबसिडी वाचते. तसेच उत्पादनही वाढते. नॅनो खताच्या खरेदीत भ्रष्टाचार झालेला नाही. भ्रष्टाचार झाला म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांसह देशाची फसवणूक करणे आहे. याआधी दमानिया यांनी अनेक जणांना बदनाम केले असून आताच्या या एपिसोडमध्ये मी आहे”, असे धनंजय मुंडे म्हणाले.