मुंबई । Mumbai
बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वृत्ताने सोमवारी रात्रीपासून त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अनेक माध्यमांत आणि सोशल मीडियावर त्यांच्या निधनासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या, ज्यामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती.

गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल सायंकाळपासून त्यांची प्रकृती अधिक खालावल्याचे वृत्त आले होते, ज्यामुळे सलमान खान आणि शाहरुख खानसह अनेक कलाकारांनी रुग्णालयात धाव घेतली होती. याच दरम्यान, आज पहाटे धर्मेंद्र यांचे निधन झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर वेगाने पसरले.
मात्र, धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी हे निधनाचे वृत्त पूर्णपणे फेटाळले आहे. ईशा देओलने तातडीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली. “माझे वडील धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. आम्ही विनंती करतो की, आमच्या या कठीण काळात आम्हाला प्रायव्हसी द्याल. तुमच्या प्रार्थनांसाठी आम्ही आभारी आहोत.”
या खोट्या बातम्यांवर ज्येष्ठ अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर आपला राग व्यक्त केला. हेमा मालिनी म्हणाल्या, “जे काही घडत आहे ते अक्षम्य आहे. जी व्यक्ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे आणि बरी होत आहे, त्यांच्याबद्दल जबाबदार चॅनेल्स अशा खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा योग्य आदर करा.”
धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे चाहत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील एका गावात झाला होता. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी, १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्याशी पहिले लग्न केले. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर, विवाहित असतानाच ते अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले आणि प्रकाश कौर यांना घटस्फोट न देताच त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले. धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या निधनाची खोटी बातमी पसरल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता, मात्र आता कुटुंबियांच्या स्पष्टीकरणानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.




