Tuesday, August 11, 2026
HomeनगरAhilyanagar : धीरज परदेशी हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगर कडकडीत बंद

Ahilyanagar : धीरज परदेशी हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगर कडकडीत बंद

नागरदेवळे ग्रामपंचायतीने तिघांच्या घरांवर बजावली अतिक्रमणाची नोटीस || आता बुलडोझर कारवाईकडे लक्ष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिकेचा कंत्राटी विद्युत कर्मचारी धीरज रजपूत-परदेशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला अहिल्यानगर बंद सोमवारी (10 ऑगस्ट) दुसर्‍या दिवशीही कडकडीत पाळण्यात आला. शहरातील प्रमुख बाजारपेठा, दुकाने, हॉटेल्स, महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळा बंद राहिल्या. सावेडी, केडगाव उपनगरांसह भिंगार परिसरातही बंदला प्रतिसाद मिळाला. नगर शहरातील बहुतांश व्यवहार ठप्प झाल्याने जनजीवनावर परिणाम झाला. दरम्यान, धीरज यांच्यावर हल्ला करणार्‍या आरोपींच्या घरांसह अन्य मालमत्तांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात असून, नागरदेवळे ग्रामपंचायतीने तिघांच्या घरांवर अतिक्रमणासंदर्भातील नोटिसा बजावल्याने संभाव्य बुलडोझर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

शुक्रवारी (7 ऑगस्ट) मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे पथदिवे दुरूस्तीसाठी गेलेल्या परदेशी यांच्यावर हल्ला झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी शहरात पसरताच वातावरण तणावपूर्ण झाले. सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी रूग्णालयाबाहेर ठिय्या देत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर नगर बंदची हाक देण्यात आली आणि रविवारी दुपारपासूनच शहरातील बाजारपेठा व दुकाने बंद होण्यास सुरूवात झाली.

सोमवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. सावेडी, केडगाव आणि भिंगार परिसरातही दुकाने बंद होती. नाश्ता व जेवणाची हॉटेल्सही बंद राहिल्याने शहरात शिक्षणासाठी होस्टेलमध्ये राहणार्‍या विद्यार्थ्यांसह बाहेरगावाहून नोकरीसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले. महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळांवरही बंदचा परिणाम झाला. विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्‍या बसच्या चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने अनेक खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे शक्य नसल्याने शाळा प्रशासनानेही सुटी जाहीर केली.

दरम्यान, धीरज यांच्या हत्येतील आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवून ती जमीनदोस्त करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आरोपींच्या मालमत्तांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. नागरदेवळे ग्रामपंचायतीने या प्रकरणातील संशयित मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद यांच्या घरांवर अतिक्रमणासंदर्भातील नोटिसा लावल्या आहेत. संबंधित बांधकामे अतिक्रमण असल्याचा उल्लेख नोटिसांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे नोटिसांनंतर प्रशासनाकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

मुकुंदनगरकडे जाणारे रस्ते बंद
धीरज यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची मागणी त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार नेमके कोठे होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला. बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरून मुकुंदनगरकडे जाणारे विविध मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केले आहेत. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. कोणी कायदा हातात घेतला तर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

आरोपींना 18 ऑगस्टपर्यंत कोठडी
परदेशी यांच्या मृत्यूप्रकरणी मुस्तकीम सय्यद (वय 20), मेहराज सय्यद (वय 22) आणि सिराज सय्यद (वय 21, सर्व रा. आलमगीर) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपींना तेलंगणाला पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून ख्वाजामियॉ उर्फ अकरम याकुब सय्यद (वय 52, रा. आलमगीर, अहिल्यानगर) आणि वसीम सय्यद (वय 47, रा. वाबळे कॉलनी, फकीरवाडा, मुकुंदनगर) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले. हल्ला कोणत्या कारणातून करण्यात आला, हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, आरोपींना पळून जाण्यासाठी नेमकी कोणी व कशी मदत केली, यासह विविध मुद्द्यांवर तपासासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पाचही आरोपींना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, शिंगणापूरमध्ये पार्किंगची पर्यायी व्यवस्था

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण...