अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी श्रीरामपूर येथील एका वृध्द डॉक्टरांची तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या रकमेचा मागोवा घेताना येथील सायबर पोलिसांच्या तपासात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील तीन संस्थांच्या बँक खात्यांवर प्रथम ही रक्कम जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर हीच रक्कम देशभरातील सुमारे 499 व्यक्तींच्या खात्यांवर वर्ग करण्यात आली होती. दरम्यान, सायबर पोलिसांनी सर्व संशयित खाती गोठवली असून पुढील तपास सुरू आहे.
सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून श्रीरामपूर येथील वृध्द डॉक्टरांकडून तब्बल 7 कोटी 17 लाख 25 हजार रूपये लुबाडले आहेत. गुन्हेगारांनी सर्वोच्च न्यायालय, ईडी आणि पोलीस अधिकार्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठवून डॉक्टरांना घाबरवले व वेळोवेळी त्यांच्या खात्यातून रक्कम हस्तांतरित करून घेतली. या प्रकरणी डॉक्टरांनी 13 ऑक्टोबर रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 7 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडला आहे.
गुन्हेगाराने अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल केले होते. एका कॉलमध्ये डॉक्टरांना एक नंबर पाठवून हा तुमचा नंबर आहे का? अशी चौकशी करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांवर अवैध जाहिरात, अश्लीलता आणि त्रास देणे (हरासमेंट) यासंबंधी प्रकरण दाखल असल्याचे सांगण्यात आले. दबावाखाली डॉक्टरांनी वेळोवेळी 7 कोटी 17 लाख 25 हजार रूपये विविध खात्यांमध्ये वर्ग केले. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
फिर्यादी डॉक्टरांनी पाठवलेली रक्कम प्रथम उत्तर प्रदेशातील दोन व महाराष्ट्रातील एका संस्थेच्या खात्यावर जमा झाली होती.
तेथून ही रक्कम 117 व्यक्तींच्या नावे असलेल्या खात्यांवर वर्ग झाली. ही पहिल्या टप्प्यातील (पहिल्या स्तरावरील) खाती मानली जात आहेत. त्यानंतर या खात्यांमधून 382 अन्य खात्यांवर रक्कम वळवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अजून काही खात्यांवर ही रक्कम गेली आहे का, याचा तपास सुरू आहे. दरम्यान सायबर पोलिसांनी आतापर्यंतची सर्व 499 बँक खाती गोठवली असून, गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे.





