लासलगाव | वार्ताहर Lasalgaon
देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत असल्याने कांदा नगरी लासलगाव बाजार समितीत पांच दिवसात कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल ९१९ रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होत असून त्याचा फटका देशांतर्गत बाजारभाव ला बसत असल्याचे व्यापारी वर्तुळात बोलले जात आहे.
लासलगाव बाजार समितीत गेल्या बुधवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ५ हजार ७०० रुपयांचा दर मिळाला होता. पांच दिवसात दरात मोठी घसरण होऊन आज मंगळवार दि.२४ रोजी कमाल दर ४ हजार ८७१ रुपयां पर्यंत खाली आले आहे. कांदा उत्पादनासाठी मोठा खर्च आणि पाण्याची टंचाई अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होत आहे.
लासलगाव बाजार समितीत आज ४८३ वाहनांमधून ६०९२ क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याला प्रतिक्विंटल किमान १ हजार ३११ कमाल ४ हजार ७८१ रुपये सरासरी ४ हजार २५० बाजार भाव मिळाला.
उन्हाळ कांदा किमान १ हजार रुपये, कमाल ४१८१ रुपये सरासरी ४ हजार रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला.
पांच दिवसात लाल कांद्याच्या कमाल दरात प्रतिक्विंटल ९१९ रुपये, तर सरासरी दरात ४५० रुपये आणि उन्हाळ कांदा किमान दरात ३५४ रुपये सरासरी दरात २०० रुपयांनी कोसळले आहे.
एकीकडे पाण्याअभावी कांद्याचे पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे, तर दुसरीकडे बाजारपेठेत कांद्याच्या दरात घसरण होत आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कांदा दरातील घसरण कधी थांबणार आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार, असा सवाल कांदा उत्पादकांकडून केला जात आहे.यंदा सात एकर क्षेत्रात लाल कांद्याची लागवड केली होती . पाण्याअभावी पाच एकरांतील पीक सोडून द्यावे लागले. दोन एकरांतील कांदा टँकरच्या पाण्यावर जगवला. गेल्या आठवड्यात कांद्याला ४ हजार ९०० रुपये दर मिळाला होता. आज त्याच कांद्याला अवघा ३ हजार ५०० रुपये भाव मिळाला. आठ दिवसांत १ हजार ४०० रुपयांची घसरण झाली. दुष्काळी परिस्थितीत शेतीचा खर्च कसा भागवायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
अजित गाडे, कांदा उत्पादक, तळेगाव रुई




