मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देतानाच शिक्षणातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणे, हा शिक्षण विभागाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याने हे कार्य समर्पित भावनेने शिक्षकांंनी करावे, असे आवाहन येथे बोलतांना केले.
येथील एकात्मता जॉगिंग ट्रॅकवर आयोजित कार्यक्रमात विद्यार्थिनींना ५०० सायकलींचे वितरण आज करण्यात आले. तसेच पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना मंत्री भुसे बोलत होते. प्राथमिक शिक्षणाधिकारी सरोज जगताप, शिक्षणाधिकारी नरेश पाटील, मालेगाव एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष रविंद्र दशपुते, प्रदिप कापडिया, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर इंगळे, माजी जि.प. सदस्य सुरेश पवार, हरिप्रसाद गुप्ता, मनोहर बच्छाव, अॅड. संजय दुसाने, ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम, डॉ. तुषार शेवाळे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. नीलेश कचवे, नंदूतात्या सोयगावकर, सतिष पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून मालेगावसाठी ५०० सायकल आणि ५०० शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच सामाजिक दायित्व निधीतून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी एक हजार सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी सायकल वितरणाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री भुसे यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.
ग्रामीण शाळांमध्ये सायकल बँकेची संकल्पना राबविण्यात येत आहे. आठवीपर्यंत एका शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थिनी दुसर्या शाळेत जात असल्यास, तिला दिलेली सायकल पहिल्या शाळेत परत जमा करावी. त्यानंतर ती सायकल अन्य गरजू विद्यार्थिनीला वापरासाठी देता येईल. मात्र, पुढील शाळा दोन ते पाच किलोमीटर अंतरावर असल्यास संबंधित विद्यार्थिनीला शिक्षणासाठी सायकलचा वापर सुरू ठेवता येणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
पारदर्शक शिक्षक भरती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भरती प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत ८ हजार ४३५ शिक्षक प्रत्यक्ष सेवेत रुजू झाले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये १६२ शिक्षकांची नियुक्ती झाली असून, मालेगाव तालुयात ५८ पेक्षा अधिक शिक्षकांची निवड झाली आहे. गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांना संधी मिळावी आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, या उद्देशाने शासनाने ही प्रक्रिया राबविली असल्याचे भुसे यांनी सांगितले.
शिक्षण केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना रोजगारक्षम, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनविणारे असावे. विद्यार्थ्यांमधील कला आणि क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठीही विभाग प्रयत्नशील आहे. क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविणार्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्त करण्याच्या दृष्टीनेही सकारात्मक विचार करण्यात येत असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
मालेगाव शहर आणि ग्रामीण भागात आदर्श अंगणवाड्या विकसित करण्यावर भर देण्यात येईल. तसेच खुल्या जागांमध्ये मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत आरओ जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकर्यांना नुकसानभरपाईची रक्कम थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. मालेगाव तालुयातील झोडगे, चंदनपुरी आणि दाभाडी येथील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची कामे ९९ टक्के पूर्ण झाली असून येत्या पंधरा दिवसांत या योजनांचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. या योजनांमुळे संबंधित गावांची पाण्याची गरज पुढील १० ते २० वर्षांपर्यंत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
यावेळी नवनियुक्त शिक्षक राजेंद्र दुकळे, धर्मराज जाधव, मंगेशकुमार साळुंखे, गीतांजली कचवे, नमिता गाणार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक, विद्यार्थी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.




