Wednesday, April 22, 2026
HomeनगरAhilyanagar : डिजिटल शिक्षण काळाची गरज - मुख्यमंत्री फडणवीस

Ahilyanagar : डिजिटल शिक्षण काळाची गरज – मुख्यमंत्री फडणवीस

कर्जत-जामखेडमधील 140 शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण || सभापती शिंदेंचा पुढाकार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शिक्षणात तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठी सक्षम करणे हे राज्य शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कर्जत-जामखेड तालुक्यातील 140 जिल्हा परिषद शाळांसाठी डिजिटल शैक्षणिक साहित्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी(दि.13) पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरसंवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जामखेड येथील तापनेश्वर जिल्हा परिषद शाळेत सभापती राम शिंदे उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी तसेच शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ दूरसंवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभापती राम शिंदे यांनी स्थानिक विकास निधीतून कर्जत व जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या आधुनिकीकरणावर भर दिला आहे. हा प्रकल्प ग्रामीण व शहरी भागातील शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आपल्या अध्यापन कौशल्यात वाढ करावी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सभापती राम शिंदे म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक गुणवत्तेतील तफावत दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. नवीन डिजिटल साधनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन शिक्षण प्रक्रिया अधिक रंजक व सुलभ होईल. तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले आत्मबळ वाढवावे, जेणेकरून ते स्पर्धा परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने यश मिळवू शकतील, असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, आधुनिक काळात तंत्रज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून, जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्तरापासूनच या प्रवाहाशी जोडले जाणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल सुविधांमुळे सक्षम पिढी घडवण्यास मोठी मदत होईल. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास वाढवावा. शिक्षकांनी या आधुनिक साधनांचा अधिकाधिक उपयोग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया तयार होईल, असे त्यांनी नमूद केले. जामखेड येथील तापनेश्वर जिल्हा परिषद शाळेत नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक साहित्याचे वितरण प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रा. राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून 9 कोटी 64 लाख 27 हजार रुपये किमतीच्या डिजिटल शैक्षणिक साहित्याचे आतापर्यंत एकूण 343 जिल्हा परिषद शाळांना वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये कर्जत तालुक्यातील 225, जामखेड तालुक्यातील 114 तसेच अहिल्यानगरमधील 4 शाळांचा समावेश आहे. प्रत्येक शाळेला 65 इंची संवादात्मक फलक, ई-शिक्षण प्रणाली, बिनतारी की-बोर्ड व सूचक उपकरण तसेच अखंड वीजपुरवठा यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील एकूण 266 शाळांपैकी सन 2022-23 मध्ये 41, सन 2024-25 मध्ये 100 आणि सन 2025-26 मध्ये 84 अशा एकूण 225 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील एकूण 173 शाळांपैकी सन 2022-23 मध्ये 30, सन 2024-25 मध्ये 28 आणि सन 2025-26 मध्ये 56 अशा एकूण 114 शाळांमध्ये डिजिटल साहित्य वितरित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज ठप्प

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (Nashik Regional Transport Office) सुमारे ४० कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपात (Strike) सहभाग घेतल्यामुळे मंगळवारपासून कार्यालयातील कामकाज पूर्णपणे...