ओझे | विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) गेल्या दोन दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले खळखळून वाहू लागले असून, तालुक्यातील (Taluka) सर्वच धरणाच्या क्षेत्र चांगला पाऊस (Rain) पडत असल्याने पाणीसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
तालुक्यातील सहा मोठ्या धरणांपैकी पुणेगाव धरण (Punegaon Dam) आज (गुरुवारी) ९८ टक्के इतके भरले असून, धरणातून उनंदा नदीमध्ये आठ हजार क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणाच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असल्याने या सोडलेल्या पाण्यामुळे धरणाजवळील पुल पाण्याखाली गेल्याने कोशिंबे ते पांडणे रस्ता बंद झाला आहे. विशेष म्हणजे मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात झाल्यामुळे पुणेगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
पुणेगाव धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे ओझरखेड धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून,हे धरण ५६.१९ टक्के इतके भरले आहे. या धरणातूनच वणी व दिंडोरी शहरासह चांदवड तालुका पाणी पुरवठा योजना तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लागला. तालुक्यातील पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कायम असून, ननाशी मंडळामध्ये २२८ मिमी तर कोशिंबे मंडळात १३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या परिरातील संपूर्ण पूर पाणी करंजवण धरणात येत असल्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने हे धरण ५०.४९ टक्के इतके भरले आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यासह निफाड, येवला, मनमाड येथील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
त्याचप्रमाणे उमराळे मंडळातही ११० मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे वाघाड धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत असून, वाघाड धरण ५०.५२ टक्के इतके भरले असल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. तसेच मृत साठ्यामध्ये असणारे तिसगाव धरण हळूहळू भरत असून, हे धरण २१.२१ टक्के भरले आहे. पश्चिम भागात दमदार पाऊस पडत असल्यामुळे कादवा, कोलवन नदीला पूर आला असून, हे पाणी पालखेड धरणात जमा होत असल्याने धरणाचा पाणीसाठा ६४. ७४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
धरणात पाण्याची आवक जास्त असल्यामुळे धरणातून कादवा नदीत १२ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येणार आहे. तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, खरीप हंगामातील टोमॅटो लागवडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.
प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा
दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यानां मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. नागरिकांनी धरणाच्या ठिकाणी त्याचप्रमाणे पूर आलेल्या ठिकाणी गर्दी करू नये. याशिवाय पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचा किंवा वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये. तसेच शाळेतील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




