नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे. अंतिम सामन्यात भारताने बलाढ्य इराणचा ३७-३४ असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. जपानमधील टोकाई सिटिझन्स जिम्नॅशियममध्ये झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासून आघाडी घेतली; मात्र दुसऱ्या सत्रात इराणने जोरदार पुनरागमन केल्याने सामन्याचा थरार अखेरपर्यंत कायम राहिला.
पहिल्या सत्रात भारताची आघाडी
सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघाने आक्रमक खेळ करत इराणच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताने २२-१६ अशी सहा गुणांची आघाडी घेतली होती. भारताने पहिल्या सत्रात इराणवर ऑलआउटही मिळवला. तसेच, एक गुण सुपर टॅकलमधून कमावला. भारताच्या लेकींच्या या कामगिरीमुळे भारताला यंदा तिसरे गोल्ड मेडल मिळाले आहे. याआधी भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाने एक तर नेमबाजीत मिश्र प्रकारात दुसरे सुवर्णपदक भारताने जिंकले आहे.
इराणचे जोरदार कमबॅक
दुसऱ्या सत्रात मात्र इराणने सामन्याचे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. भारतीय आघाडी कमी करत इराणने २६-२७ अशी स्थिती निर्माण केली. त्यामुळे सामना अत्यंत चुरशीचा झाला. या निर्णायक टप्प्यावर भारताच्या खेळाडूंनी संयम राखला. संजूच्या महत्त्वपूर्ण रेडमुळे भारताला दोन गुण मिळाले, तर त्यानंतर पुष्पा राणाच्या महत्त्वपूर्ण टॅकलने भारताची आघाडी पुन्हा वाढवण्यात मदत केली. अखेर भारतीय बचावफळीने शेवटच्या काही मिनिटांत इराणला पुनरागमनाची संधी दिली नाही आणि भारताने ३७-३४ असा विजय मिळवला.
निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी! २४ तासांनंतर लालबागच्या राजाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन
भारताचे महिला कबड्डीतील चौथे आशियाई सुवर्ण
या विजयासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला कबड्डीचे चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. महिला कबड्डीचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश झाल्यापासून भारताने २०१०, २०१४ आणि २०२२ मध्ये सुवर्णपदक पटकावले होते. २०१८ च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत मात्र इराणने भारताचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते. २०२२ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताने सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने आपल्या विजेतेपदाचा बचाव केला आहे.




