अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दोन दिवसांपासून दिवाळी सणाच्या उत्सवाला प्रारंभ झाला असून आज रविवारी दिवाळी सणाचा मुख्य दिवस आहे. गेल्या आठवडाभरापासून शहरातील मुख्य बाजारपेठेतसह उपनगरात खरेदीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहत आहेत. कपडे, सोन्या-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, तसेच गृहसजावटीचे साहित्य आणि आकाशकंदिल खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातूनही नागरिक मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत. यामुळे शहरातील व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण असून, बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.
दिवाळीच्या पहिल्या आंघोळीसाठी आणि पाडव्यासाठी नवीन कपडे खरेदी करण्याला नागरिक सर्वोच्च प्राधान्य देत आहेत. शहरातील कापड बाजार, चितळे रोड, माळीवाडा, सावेडी परिसर आणि सर्जेपुरा परिसरातील दुकानांमध्ये पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही. बालगोपाळांचे कपडे, महिलांसाठी साड्या आणि पुरुषांच्या कपड्यांच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक नामवंत ब्रँड्स आणि स्थानिक व्यापार्यांनी विविध ऑफर्स आणि सवलती जाहीर केल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद अधिकच वाढला आहे.दिवाळी मुहूर्तावर सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जात असल्याने, शहरातील सराफ बाजारात ग्राहकांची मोठी वर्दळ सुरू झाली आहे.
सोन्याचे दर चढे असले, तरी सुवर्णालंकार आणि चांदीची नाणी खरेदी करण्यासाठी नागरिक उत्सुक दिसत आहेत. यासोबतच, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि आधुनिक स्मार्टफोन्सच्या खरेदीसाठी इलेक्ट्रॉनिक शोरूम्स आकर्षक रितीने सजले असून, तिथेही बुकिंगचा ओघ मोठा आहे.आकाशकंदिल, पणत्या आणि रांगोळीचे रंगीबेरंगी स्टॉल्स, शहराच्या मुख्य चौकांमध्ये, विशेषतः माळीवाडा आणि जुने बसस्थानक परिसराच्या फूटपाथवर दिवाळीच्या विशेष वस्तूंचे शेकडो स्टॉल्स थाटले आहेत. यंदा बाजारात पर्यावरणपूरक मातीच्या आकर्षक पणत्या, पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीचे एलईडी आकाशकंदिल आणि रांगोळीच्या विविध रंगांना मोठी मागणी आहे.
बाजारपेठेत वाहतूक कोंडी
बाजारपेठेत झालेल्या या अलोट गर्दीमुळे शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. माळीवाडा चौक, दिल्ली गेट आणि कापड बाजार भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहर वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी मुख्य चौकांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. बाजारपेठेत चोरांचा आणि पाकीटमारांचा सुळसुळाट होऊ नये, म्हणून साध्या वेशातील पोलीसही गस्त घालत आहेत.
फटाके खरेदीसाठी गर्दी
शहरातील विविध भागांत दिवाळी साहित्य विक्रीची प्रदर्शने आणि तात्पुरते स्टॉल उभारण्यात आल्याने स्थानिक बाजारपेठांमध्येही खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. शहरातील डॉ. आंबेडकर पुतळ्या लगड, कल्याण रोड, अरणगाव, सावेडी, प्रोफेसर कॉलनी यासह एमआयडीसी भागात फटाक्यांची घाऊक विक्री करणारी दुकाने आहेत. यंदाही फटाके खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून दिवाळीच्या खरेदीच्या निमित्ताने शहरातील वर्दळ वाढली आहे.




