अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राहुरी तालुक्यातील अत्याचार्याच्या घटनेतील पीडित महिला व तिच्या मुलांना बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणारा व श्रीरामपूर उपविभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार करणार्या गुन्ह्यातील आरोपी व पुणे पोलीस दलातील बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लक्ष्मण लोखंडे (वय 52 रा. वानवडी, पुणे) याने मंगळवारी (10 जून) सकाळी येथील जिल्हा रूग्णालयातून पलायन केले आहे. यामुळे रूग्णालय प्रशासन व पोलीस दलात खळबळ उडाली असून त्याचा शोध घेतला जात आहे.
लोखंडे याच्याविरूध्द एका महिलेने अत्याचाराचा आरोप करत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पीडित महिलेने जबाब देण्यापूर्वीच तिला आणि तिच्या दोन मुलींना धमकवण्यासाठी लोखंडे 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी तिच्या घरी पोहोचला. त्याने त्याच्या जवळील रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दहशत निर्माण केली व त्यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तत्कालीन उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा लोखंडेने हवेत गोळी झाडून दहशत निर्माण केली. पोलीस पथक पीडितेच्या मुलींना सुरक्षितपणे बाहेर काढत असताना उपअधीक्षक मिटके व लोखंडे यांच्यात झटापट झाली व लोखंडेने गोळी झाडली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटकेत असलेला व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या लोखंडे याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच्या बंदोबस्तासाठी येथील पोलीस मुख्यालयातील दोन अंमलदारांची नियुक्त करण्यात आलेली होती. त्या पोलीस अंमलदारांना गुंगारा देऊन त्याने पळ काढला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून, त्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, यासंदर्भात लोखंडे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार संजु वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. भारतीय न्याय संहिता कलम 262 प्रमाणे (एखाद्या व्यक्तीने आपल्या कायदेशीर अटकेला प्रतिकार किंवा अटकाव करणे) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पुणे पोलीस दलातून बडतर्फ
सुनील लोखंडे हा पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असताना त्याच्याविरूध्द शिरूर पोलीस ठाण्यात दोन खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते. एका गुन्ह्यात त्याला पाच वर्ष शिक्षा देखील ठोठावण्यात आली आहे. त्यानंतर त्याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. दरम्यान, लोखंडे विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचारा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याने पीडितेला धमकावताना उपअधीक्षक मिटके यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर देखील लोखंडे विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन पोलिस कर्मचारी निलंबित
पोलीस मुख्यालयातील अंमलदार संजू किसन वाघमारे व योगेश यशवंत दायजे या दोघांना लोखंडे उपचार घेत असलेल्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळे लोखंडे पसार झाला आहे. त्या दोघांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.