Tuesday, November 24, 2026
Homeनगरराज्य नाट्य स्पर्धा : नाती दुरावलेल्या वृद्धत्वाची करूण कहाणी 'एक एक पान...

राज्य नाट्य स्पर्धा : नाती दुरावलेल्या वृद्धत्वाची करूण कहाणी ‘एक एक पान गळावया…’

-संदीप जाधव

उमेदीच्या काळात नात्यांचे वैभव आणि आर्थिक सुबत्ता असणारा व्यक्ती वृद्धावस्थेत मात्र अनेकदा एकाकी पडतो. जरा दुर्लक्ष झाले की आपली मुलाबाळांना आपली अडगळ होत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. नाती गमावल्याचे दुःख असलेल्या व कायम नात्यांच्या आठवणींत जगणार्‍या अशाच एका वृद्धाची कथा दर्शविणारी ’एक एक पान गळावया’ ही दोन अंकी नाटिका राज्य नाट्य स्पर्धेत रंगमंचावर पाहायला मिळाली.

- Advertisement -

अहिल्यानगरच्या रंगमुद्रा युवा प्रतिष्ठानने सादर केलेले या नाटकाचे लेखक डॉ. समीर मोने आहेत. त्यांनी लिहिलेल्या नाटकाचे दिग्दर्शन प्रा. रवींद्र काळे यांनी केले. खरंतर अशी नाटकं स्पर्धेला निवडणे म्हणजे मोठे धाडस असते. सलग कथानक नसलेल्या आणि अनेकदा आभासी प्रसंगांत प्रवेश करत असलेले नाटक प्रेक्षकांना लगेच समजत नाही. हे नाटक अभिनयप्रदान होते. प्रा. काळे यांनी दिग्दर्शनाबरोबरच मध्यवर्ती भूमिका योग्यपणे वठवली. नाटकाची सुरुवातच आभासी प्रसंगातून होते. अप्पा या ज्येष्ठ गृहस्थाचे मन रिझविण्यासाठी आत्माराम हा गायक आलेला असतो. त्यांच्या संवादानंतर मग एकएका प्रसंगांतून पात्रांची ओळख होते. अप्पा हे एका आरोग्य सदनात दाखल असतात. पूर्वी वैभवात जीवन व्यतित केल्यानंतर त्यांची कौटुबिक नाती त्यांच्यापासूून दुरावतात. आजारपणामुळे पत्नीचे निधन झालेले असते. लहान मुलगा म्हणजे अनिरुद्धची पत्नी व मुलगी स्वाती घरातून निघून गेलेल्या असतात, तर दारूच्या व्यसनापायी अनिरुद्ध मरण पावलेला असतो. परदेशात नोकरी करणारा विश्वंभर काही काळ वडिलांजवळ राहतो. वडिलांना आरोग्य सदन या नर्सिंग होममध्ये दाखल करून पुन्हा परदेशात गेलेला असतो.

कौटुंबिक सदस्यांचे आपल्यापासून दूर जाणे अप्पांना सतावत असते. एकाकीपणामुळ अप्पांची घुसमट होते. मग त्यांना आपल्या जीवनाशी निगडीत असलेले अनेक प्रसंग आठवतात. अनेकदा भासही होतात. अशा प्रसंगांतून नाटक पुढे सरकते. प्रेमळ पत्नीला दिलेली कठोर वागणूक, तिचा मृत्यू अप्पांना भावनाविवश करतो. वृद्धत्वात मुलाकडून होणारी अवहेलना त्याला अस्वस्थ करते. घराची, कुटुंबाची आस असलेल्या अप्पांच्या जीवनातून एक एक नाती निघून जातात. जसजसे दिवस पुढे सरकतात घरातील वस्तूही कमी होतात. जणू घरातील व नात्यांत रिकामपण येते. हा आशय अधोरेखित करण्यासाठी अप्पांच्या संवादावेळी वरून गळून पडणारे एक एक पान प्रसंग प्रभावी बनवते. स्मृतीभ्रंशाचा आजार जडावल्याने शेवटी व्याकूळतेतच अप्पांचा अंत आरोग्य सदनात होतो. त्यांच्या अंत्यविधीला केवळ आत्माराम उपस्थित असतो. या भावूक प्रसंगाने नाटकाची समाप्ती होते.

नाटकाच्या केंद्रस्थानी असलेल्या अप्पाची करूण कहाणी दाखविताना अनेक आठवणींचे प्रसंग योग्यरित्या जुळवून दिग्दर्शक रवींद्र काळे यांनी शेवटी प्रेक्षकांना रडायला लावले. दिग्दर्शकाची भूमिका साकारतानाच मध्यवर्ती भूमिकाही उत्तमपणे सांभाळली. इतर पात्रांकडेही चांगले लक्ष दिले. त्यामुळे नाटकाचे सादरीकरण प्रेक्षकांना कमालीचे भावले. नाटकातील मध्यवर्ती भूमिका असलेले अप्पा हे पात्र प्रा. रवींद्र काळे यांनी साकारले. आवाजातील योग्य चढ-उतार आणि स्पष्ट संवाद यामुळे त्यांची भूमिका उठावदार तर झालीच, पण कसलेला अभिनय व त्याला मिळालेली देहबोलीची साथ यामुळे ती आणखी बहरली. धीरगंभीर हावभाव, डोळ्यातील आर्जव यामुळे करूण प्रसंग प्रभावी ठरले. वृद्धाश्रमातील व आभासी प्रसंगांतील विसराळूपणा, स्वभावातील परखडपणा, भावनाविवशता त्यांना उत्तम जमली. त्यांचे पाठांतर एकदम दांडगे होते. त्यांच्या संवादानी दोन-तीन वेळेस हशाही पिकला.

विश्वंभर हे पात्र प्रा. योगेश विलायते यांनी साकारले. पित्याची चिंता, नम्रपणा प्रसंगी कठोरपणा हे सारे गुण त्यांच्या अभिनयातून सहजपणे जाणवले. एका प्रसंगात रडताना ते जणू खरोखरच रडताहेत की काय असा भास झाला. चिंतातूर भाव त्यांच्या वाट्याला अनेकदा आले. कावेरी व सुकन्या या दोन्ही भूमिका चिन्मयी खताळ यांनी सांभाळल्या. दोन्ही भूमिका अगदी वेगळ्या होत्या. एका बाजूला सामान्य गृहिणी, तर दुसरीकडे स्पष्ट बोलणारी पण रुग्णाची काळजी घेणारी डॉक्टर त्यांनी सहज उभी केली. आजारपणातील दुःखी संवाद व मुलगा अनिरुद्धला मारताना धारण केलेले रूद्ररूप भावले. काही प्रसंगांत त्यांचे संवाद नीटसे ऐकू येत नव्हते.

अनिरुद्ध व गणपत या दोन्ही भूमिका विशाल काशिद यांच्याकडे होत्या. पित्यावर खेकसताना रागीट भाव योग्य जमले असले तरी ही भूमिका आणखी प्रभावीपणे करता आली असती. गणपतची छोटी भूमिका उत्तम वाटली. स्वाती, श्रद्धा, विभावरी, उज्वला ही चौरंगी भूमिका रेवती गायकवाड यांनी केली. नाटकाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत वेगवेगळ्या प्रसंगांत आलेले हे चारही पात्र त्यांनी पूर्ण केले. केअर टेकर विभावरी व स्वातीची भूमिका अधिक समर्पक वाटली. बाकीच्या दोन्ही भूमिका यथायोग्य करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आत्माराम हे पात्र प्रतीक वाळुंजकर यांनी रंगमंचावर आणले. पहिल्या प्रसंगात व नाटकाच्या अंतिम टप्प्यात आलेले हे पात्र त्यांनी ठळकपणे बिंबवले. शांत-संयमी स्वभावाचे योग्य दर्शन त्यांनी घडविले. विविध गितांची पद गावून आपल्यातील उत्तम गायकाची झलकही त्यांनी उत्कृष्टपणे दाखविली. योग्य हावभाव त्यांनी साकारले.

नाटकातील प्रत्येक पदर उलगडून दाखविताना तांत्रिक बाजूंची चांगली साथ मिळाली. नेपथ्य रियाज पठाण यांच्याकडे होते. घरातील जुना वस्तू, जुनी पुस्तके, लाकडी फर्निचर, रेडिओ, टेप, अस्ताव्यस्त पडलेले इतर साहित्य यावरून एका व्यासंगी व्यक्तीच्या घराच्या अडगळीतील खोलीची प्रचिती येत होती. हिरव्या पडद्यावरून दवाखान्याची चाहूल लागली. शेवटच्या प्रसंगात वरून पडणारे एक एक पान नाट्यशीर्षकाशी जणू नाते सांगत होते. प्रकाश योजना गणेश लिमकर यांची होती. नाटक मूळ प्रसंगांतून आभासी प्रसंगात जाताना विशिष्ट रंगाची लाईटचा वापर कल्पकतेने केला गेला. एका प्रसंगांत हे लाईट उशिरा लागले. विविध पात्रांना प्रसंगानुरूप स्पॉट दिलेले स्पॉट आणि शेवटच्या प्रसंगातील चितेचा आभास निर्माण करणारी प्रकाश योजना समर्पक वाटली. खिडकीतील कवडसेही उत्तम होते.

संगीत विहान विलायते यांचे होते. धीरगंभीर व भावनाविवश प्रसंगात अनुरूप संगीत त्यांनी दिले. आत्मारामच्या गायनावेळी पेटीचा सूरही उत्तम वाटला. चितेचा आवाजही उत्तम. वेशभूषा भाग्यश्री जोशी यांची होती. अप्पांचा पांढरा पेहराव योग्य वाटला. स्वाती, विभावरी, उज्वला, आत्माराम यांची वेशभूषा चांगली होती. मात्र, कावेरीने नेसलेली साडी जराशी खटकली. रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांनी केली होती. अप्पा, कावेरी, सुकन्या, आत्माराम, विभावरी यांची रंगभूषा उत्कृष्ट वाटली. कुठल्याही पात्राची रंगभूषा भडक नव्हती. रंगमंच व्यवस्था किरण काळे, प्रा. विजय साबळे यांनी पाहिली. ब्लॅकआऊटमध्ये प्रसंगत बदलताना लागणार्‍या वस्तू चपळाईने मांडल्या जात होत्या.

डॉ. समीर मोने या प्रतिथयश लेखकाच्या या नाटकाला प्रा. रवींद्र काळे यांनी न्याय देण्याचा चांगला प्रयत्न केला. तसे पाहिले तर हे नाटक एकदम क्लिष्ट होते. मूळ प्रसंगांतून अनेक वेळा नाटक आभासी प्रसंगात जात होते. त्यामुळे प्रेक्षकांना समजायला जरा जड होते. पण अभिनयाच्या जोरावर नाटक तडीस नेले. नाटकाचा आत्मा असलेल्या अप्पा या पात्राने चांगली वातावरण निर्मिती केली. नाटकाच्या शेवटाने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले.

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : नाशिक तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्यासाठी तातडीने प्रस्ताव...

0
नाशिक | Nashik नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) शेतकरी आणि नागरिकांना निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत दिलासा मिळावा, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी नाशिक...