अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेचा पहिला महत्त्वाचा टप्पा असलेला सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव सादर करण्याचा कालावधी गुरुवारी (16 जुलै) सायंकाळी साडेसहा वाजता संपला. 17 जून ते 16 जुलै या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये प्रचंड राजकीय आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. ज्या व्यक्तींचे नाव या ठरावात अंतिम झाले आहे, त्यांनाच जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवार किंवा मतदार म्हणून सहभागी होता येणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जिल्ह्यातील ज्या सहकारी संस्था 1 जून 2023 किंवा त्यापूर्वी बँकेच्या सभासद असतील त्याच पात्र राहणार आहेत. यात प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था सोडून इतर सहकारी संस्था थकबाकीत असतील, तर अशा संस्था प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार राहणार नाही. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था जर थकबाकीत असेल, तर अशा संस्थांच्या संचालकांच्याऐवजी सदर संस्थेच्या थकबाकीदार नसलेल्या एखाद्या सदस्याचा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात करण्याचा ठराव घेण्यात आलेला आहे. तसेच ज्या संस्थांवर सहकार विभागाच्यावतीने 73 क, अ (1), (ळ) फ अन्वये कार्यवाही केलेली असले अशा संस्था मतदानासाठी पात्र राहणार नाहीत, असे सहकार विभागाच्यावतीने महिनाभरापूर्वी ठराव प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी जाहीर करण्यात आले होते.
बँकेच्या निवडणुकीसाठी सभासद संस्थांचे प्रतिनिधींचे ठराव संस्थेचे मुख्यालय असलेल्या जिल्ह्यातील संबंधित उप / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत 17 जून ते 16 जुलै 2026 या कालावधीत सादर करण्यात आले. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम पूर्ण झाला असून आता पुढील महिनाभरात मतदार यादी कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बँकेसाठी ऑगस्ट अथवा सप्टेंबरमध्ये निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागा असून त्यात 14 जागा या 14 तालुक्यातील सेवा सोसायट्यांसाठी आहे. तसेच 2 जागा महिला राखीव, अनुसूचित जाती- जमाती, ओबीसी, एनटी या प्रवर्गासाठी प्रत्येकी 1 या प्रमाणे 3 तर शेती पूरक व बिगर शेती मतदारसंघासाठी प्रत्येकी 1 प्रमाणे दोन अशा 21 जागा राहणार आहेत. यातील 14 तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून मतदानासाठी प्रत्येकी एकान नाव फायलन करून ते सहकार खात्याकडे पाठवण्यात आलेले आहे.
दरम्यान, ठराव करून ते मतदानाचा अधिकार असणार्यांची नावे आता सहकार विभागाच्या यादीत समावेश झाला आहे. आता सहकार विभाग आज जिल्ह्यातील सर्व ठरावातील नावांचे एकत्रिकरण करून ते पुन्हा बँकेकडे तपासणीसाठी पाठवणार आहेत. त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप यादी तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रत्येक तालुक्यातून आपल्या गटाचे आणि आपले नाव ठरावातून पुढे पाठवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या सहकारात राजकीय घडामोडी घडल्या. ठराव नाव असणार्या व्यक्तीला निवडणुकीसह जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहभाग घेता येणार आहे.
पालकमंत्री विखें विरोधात पुन्हा समविचारी एकत्र ?
जिल्हा बँकेच्या राजकारणात सहसा पक्षीय जोडे बाजूला ठेवून सहकार पॅनल उभे केले जाते. नुकत्याच छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजप नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. याच धर्तीवर अहिल्यानगरमध्येही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना रोखण्यासाठी सर्वपक्षीय समविचारी नेते पुन्हा एकत्र येणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात, विवेक कोल्हे आणि दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाने राजकीय मतभेद बाजूला सारत विखे गटाला एकटे पाडले होते. त्यावेळी 21 पैकी 17 ते 18 जागांवर महाविकास आघाडी व समविचारी नेत्यांच्या पॅनलने बाजी मारली होती, तर विखे गटाला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीतही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार की विखे गट नवीन रणनीती आखणार, यावरून जिल्ह्याचे सहकार क्षेत्र ढवळून निघणार आहे.
साडेपाच हजार मतदार
ठराव कार्यक्रमानंतर मतदार यादी कार्यक्रमात यामध्ये कोणत्या विकास सोसायट्यांचे नाव मतदार यादीत राहणार, संबंधित सोसायटी थकबाकीत आहे का, मजूर सोसायट्या, दूध संघ यासह अन्य पात्र सहकारी संस्थांचे सुमारे 5 हजार ते 5 हजार 500 मतदार या निवडणुकीसाठी पात्र ठरणार आहेत. तसेच सुमारे 100 ते 150 व्यक्तिगत मतदारही मतदानासाठी पात्र राहणार असल्याचा अंंदाज आहे.




