Friday, August 14, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवण्यासाठी कामाला लागा

Ahilyanagar : जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवण्यासाठी कामाला लागा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नगरच्या ‘दादा’ गटाला आदेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बुधवारी मुंबईत पक्षाच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा बँक पुन्हा पक्षाच्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांना सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. यापूर्वी नगरची जिल्हा बँक राष्ट्रवादीचे ताब्यात होती. यापुढे देखील ती राष्ट्रवादी अजित दादा गटाच्या ताब्यात राहावी, यासाठी नेत्यांनी कामाला लागावे असे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी प्राथमिक बैठक झाली. या बैठकीला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार काशीनाथ दाते, बँकेचे माजी संचालक सीताराम गायकर, राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, प्रशांत गायकवाड, अरूण तनपुरे, पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार आदी उपस्थित होते.

यावेळी घुले यांनी सद्यस्थितीची माहिती सुनेत्रा पवार यांना दिली. तालुकानिहाय पक्षाची ताकद, झालेले ठराव याबाबत घुले यांनी माहिती दिली. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी एकत्रित असतांना 10 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादीचा पहिला अध्यक्ष झाला होता. त्यानंतर दीड वर्षांनी बँकेत सत्तांतर झाले होते. तेव्हा भाजपचे स्व. आमदार शिवाजी कर्डिले हे अध्यक्ष झाले. मात्र स्व. कर्डिले यांच्या निधनानंतर पुन्हा राष्ट्रवादीकडे बँकेची सत्ता आली. चंद्रशेखर घुले हे बँकेचे अध्यक्ष झाले होते. त्यांनी चार महिने बँकेचा कारभार पाहिल्यानंतर संचालकांची मुदत संपल्याने बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले असल्याने पुन्हा बँकेत पक्षाची सत्ता आणण्याचे निर्देश यावेळी सुनेत्रा पवार यांनी दिले. बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँगे्रेसने निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आघाडी घेतली आहे.

नियोजन समिती निवडीवर आक्षेप

जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांच्या नियुक्तीला या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह नेत्यांना विश्वासात न घेता नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या मतदारसंघात पक्षाचा आमदार नाही. पण महायुतीचा आमदार आहे. अशा मतदारसंघात पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह नेत्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यांना कार्यक्रमांपासून बाजूला ठेवण्यात येत असल्याची तक्रार यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आल्या. यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी एका आमदारांसह पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कार्य पध्दतीवर नाराजी व्यक्त केली.

स्वबळाची चाचपणी
जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीत नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाने कोणावरही अवलंबून न राहता स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी ठेवावी अशी सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात सध्या सत्ताधारी भाजपमधील सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका वेगवेगळी दिसत असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादीला कसा होईल या दृष्टीने नियोजन करण्याचे यावेळी सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

नदीजोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नदीजोड प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर...