Tuesday, November 24, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्ह्यातील सुमारे 50 हजार भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार!

Ahilyanagar : जिल्ह्यातील सुमारे 50 हजार भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार!

ग्रामीण भागातील श्वान पकडण्यासाठी नाशिक, नंदुरबारच्या संस्थेवर जबाबदारी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील ग्रामपंचायत व नगरपरिषद हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी आता प्रभावी उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. या अंतर्गत नगरपालिका हद्दीत पालिका यंत्रणा, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींची यंत्रणा भटके कुत्रे पकडून ते पशुसंवर्धन विभागाकडे सोपवणार आहेत. पशुसंवर्धन विभाग या कुत्र्यांचे खच्चीकरण (निर्बीजीकरण) करून त्यांना पुन्हा संबंधित यंत्रणांच्या ताब्यात देणार आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे 50 हजार कुत्रे पकडून त्यांना जंतनाशक आणि रेबीजविरोधी लस देण्यासोबतच त्यांचे खच्चीकरण करून पुन्हा मूळ जागी सोडण्यात येणार आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. या मोहिमेत पकडलेले कुत्रे 4 ते 5 दिवस शेल्टर हाऊसमध्ये (निवारा केंद्र) ठेवले जातील. तेथे पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर विशेष केंद्र उभारून या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करतील. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना जंतनाशक आणि त्यानंतर रेबीजविरोधी लस दिली जाईल. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस पशुसंवर्धन विभागाच्या देखरेखीखाली ठेवून हे कुत्रे पुन्हा पालिका किंवा ग्रामपंचायतींकडे सोपवले जातील. जानेवारी महिन्यापासून जिल्हा परिषद आणि राज्य पशुसंवर्धन विभागाकडून याचे नियोजन सुरू होते. कुत्रे पकडणे आणि शस्त्रक्रियेसाठी नाशिक व नंदुरबार येथील संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. खच्चीकरणाची जबाबदारी पशुसंवर्धन विभागाकडे जिल्ह्यातील शहरी भागांत भटक्या कुत्र्यांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी पालिकेची, तर ग्रामीण भागात ही जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली आहे. या दोन्ही यंत्रणांनी पकडलेल्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याचे मुख्य काम पशुसंवर्धन विभाग सांभाळणार आहे.

नागरिक बिबट्या आणि भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या एकीकडे बिबट्याची दहशत, तर दुसरीकडे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट यामुळे नागरिक आणि शासकीय यंत्रणा हैराण झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल अडीच लाख नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात ही भटकी कुत्री बिबट्यासाठी सोपे भक्ष्य ठरत आहेत. यामुळे बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढल्याने नगरकर दुहेरी संकटात सापडले आहेत.

चार ठिकाणी उभारणार शेल्टर हाऊस
जिल्ह्यातील काही शहरी भागात कुत्रे पकडून त्यांच्यावर खच्चीकरण करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. मात्र, आतापर्यंत किती कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. या मोहिमेला गती देण्यासाठी जिल्ह्यात दक्षिण भागात दोन आणि उत्तर भागात दोन अशी एकूण चार शेल्टर हाऊस (निवारा केंद्रे) उभारण्यात येणार आहेत.

45 ते 50 हजार कुत्री असल्याचा अंदाज
पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भाग मिळून सुमारे 45 ते 50 हजार भटकी कुत्री असण्याचा अंदाज आहे. यामध्ये ग्रामपंचायत हद्दीत 38 ते 40 हजार, तर उर्वरित 15 नगरपालिकांच्या हद्दीत सुमारे 10 हजार कुत्र्यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

पंचवटीतील महात्मा गांधी तलावाचे नामांतर नको; ऐतिहासिक वारसा जतन करा –...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधी तलावाचे नाव बदलण्याचा प्रयत्न हा नाशिकच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाशी छेडछाड करणारा आहे. गांधीजींचे नाव बदलल्याने...