अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
‘तुमच्या घरात सगळं ठीक नाही भावकीतच कुणीतरी घरभेदी आहे, म्हणूनच अडचणी वाढत आहेत’ अशा शब्दांनी सुरूवात करून काही मिनिटांतच वृध्द नागरिकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर तोडगा काढण्याच्या नावाखाली त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी गायब करायची, अशी फसवणुकीची पध्दत अहिल्यानगर शहरात उघडकीस आली आहे. कोतवाली पोलिसांनी तपास करून दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून भविष्य सांगण्याच्या नावाखाली वृध्दाची फसवणूक कशी केली जात होती, याचा उलगडा झाला असून त्यांनी अशा पध्दतीने तिघांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
लुकमान सुलेमान मदारी, अल्ताफ हुसेन कुरेशी (रा. हल्दी, मोहल्ला, शिरूर जि. पुणे, हल्ली रा. निघोज, ता. पारनेर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. हे दोघे जण अहिल्यानगर शहरातील मंदिरे, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे अशा ठिकाणी फिरत असे. एकटे बसलेले, विशेषतः वृध्द नागरिक हे त्यांचे मुख्य लक्ष्य असायचे. एक भोंदू भविष्यकार प्रथम वृध्दाजवळ जाऊन अगदी साध्या गप्पा मारत संवाद सुरू करायचा. काही वेळातच तो स्वतःला भविष्य सांगणारा असल्याचे भासवून देवावर श्रध्दा, अध्यात्म, आणि तुमचं दुःख दूर करतो अशा भावनिक गोष्टींचा आधार घेऊन समोरच्याला आपल्या बोलण्यात गुंतवायचा.
मुलं तुमचं ऐकत नाहीत, घरात वाद आहेत, भावकीतूनच त्रास होतोय अशा विधानांमुळे वृध्द व्यक्तीला तो आपल्याच आयुष्याशी संबंधित वाटू लागत आणि विश्वास निर्माण होत होता. इतक्यात त्याचा दुसरा साथीदार तिथे येतो आणि पहिल्याने सांगितलेले भविष्य अगदी खरे ठरल्याचे नाटक करतो. माझ्या आयुष्यात सगळं बदललं असे सांगून तो विश्वास अधिक दृढ करतो. हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण यातून भोंदूंची विश्वासार्हता वाढते. यानंतर भोंदू उपाय सांगण्याच्या नावाखाली एक साधा पण प्रभावी डाव टाकतो. तो वृध्दाला खिशातून दहा किंवा वीस रूपयांची नोट काढायला सांगतो आणि तो म्हणतो, तुमच्या अंगठीवर मंत्र करून ती शक्तीशाली करावी लागेल.
वृध्दाच्या हातातील सोन्याची अंगठी तो त्या नोटेत गुंडाळतो. त्यावर रूमाल गुंडाळून काही मंत्र पुटपुटल्याचा आव आणतो. या प्रक्रियेत तो अत्यंत कौशल्याने हातचलाखी करतो आणि अंगठी अलगद स्वतःच्या तळहातात लपवतो. यानंतर तो रूमाल वृध्दाच्या हातात देतो आणि सांगतो, वीस पावले पुढे चला, मागे वळून पाहू नका मंत्र पूर्ण होईल. वृध्द त्या सूचनेप्रमाणे पुढे जातो. तोपर्यंत हे दोघे भोंदू तिथून पळ काढतात. काही वेळाने रूमाल उघडल्यावर त्यात अंगठी नसल्याचे लक्षात येते आणि तोपर्यंत उशीर झालेला असतो. अशा पध्दतीने फसवणूक केल्याच्या अहिल्यानगर शहरात दोन आणि रांजणगाव (पुणे) पोलीस ठाणे हद्दीत एक अशा तीन घटना घडल्या आहेत. तिन्ही गुन्ह्यांची उकल पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील व त्यांच्या टिमने केली आहे.
मानसिकतेचा गैरफायदा
या प्रकारात फक्त हातचलाखी नाही, तर मानसशास्त्राचाही मोठा वापर केला जातो. भीती, श्रध्दा, आणि वैयक्तिक समस्यांवर उपाय मिळेल या आशेचा फायदा घेत भोंदू लोकांना फसवतात. विशेषतः एकाकी आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील वृध्द नागरिक त्यांच्या जाळ्यात अडकतात. अनोळखी व्यक्ती भविष्य सांगते, समस्या सोडवण्याचे आश्वासन देते किंवा कोणत्याही वस्तूवर मंत्र करण्यास सांगते, तेव्हा अशा लोकांपासून सावध रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.





