अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, मंगळवारी (27 जुलै) बागरोजा हडको परिसरात एका मोकाट कुत्र्याने अवघ्या तीन वर्षीय बालकावर अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात त्रिवेंद्र सोनवणे हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिवेंद्र हा परिसरात खेळत असताना अचानक एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. कुत्र्याने बालकाला चावा घेतल्याने त्याने आरडाओरडा केला. जवळच असलेल्या महिलेने आरडाओरडा करत धाव घेत कुत्र्याच्या तावडीतून बालकाची सुटका केली. त्यानंतर जखमी अवस्थेतील त्रिवेंद्रला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर बागरोजा-हडको परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पायी प्रवास करणार्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, गेल्या शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत अनेक नगरसेवकांनी शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव हा गंभीर विषय असल्याचे सांगत तातडीने बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली होती. बंदोबस्त केला नाही तर महापालिकेच्या अधिकार्यांच्या घरात मोकाट कुत्रे सोडण्याचा इशारा दिला होता. शहरातील विविध भागांत कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना झाल्याचे दिसून येत नसल्याने महानगरपालिकेच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर संताप व्यक्त होत असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने विशेष मोहीम राबवून पिसाळलेल्या व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




