Wednesday, November 4, 2026
Homeदेश विदेशमी निवडणुकीच्या रिंगणात नव्हतो, नाहीतर...; निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्पची सारवासारव

मी निवडणुकीच्या रिंगणात नव्हतो, नाहीतर…; निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्पची सारवासारव

नवी दिल्ली | New Delhi
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या पराभवानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभवाच्या कारणांवर भाष्य करताना स्वतःची भूमिका वेगळी आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. निवडणुकांचे निकाल आल्यानंतर त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हंटले की, “मी निवडणुकीच्या रिंगणात नव्हतो. जर मी निवडणुकीत असतो, तर रिपब्लिकन पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळवला असता,” असा दावा त्यांनी केला. काही ठिकाणी मतदारांना उमेदवार पसंत नव्हते, तर काही उमेदवार आपले समर्थक नव्हते, त्यामुळे पक्षाच्या मतदारांनी मतदानापासून दूर राहणे पसंत केले, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वतःच्या धोरणांवर न घेता ट्रम्प यांनी उमेदवार आणि मतदानातील कमी उत्साहाकडे बोट दाखवल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसच्या सिनेट आणि प्रतिनिधीगृहामध्ये डेमोक्रेटीक पक्षाला बहुमत मिळालं आहे. प्रतिनिधीगृहात डेमोक्रेटीक पक्षांनी आतापर्यंत २१९ जागा जिंकल्या आहेत. ४३५ पैकी ३४५ जागांचे निकाल जाहीर झाला असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन्स पक्षाला फक्त १२६ जागा मिळाल्या आहेत. सिनेटमध्येही डेमोक्रेटीक्सना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन्सना फक्त ४१ जागा जिंकता आल्या. तर डेमोक्रेटीक पक्षांनी सिनेटमध्ये ५३ जागांवर विजय मिळवला.

- Advertisement -

निवडणुकीच्या निकालांनंतर स्वतःचा थेट संबंध नसल्याचे सांगणाऱ्या ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मात्र पूर्णपणे वेगळी भूमिका घेतली होती. रिपब्लिकन उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये मतदारांना आवाहन करताना ट्रम्प म्हणाले होते की, “तुम्ही मतपत्रिकेवर माझेच नाव आहे असे समजून रिपब्लिकन पक्षाला मतदान करा.” मात्र, आता मतमोजणीत मतदारांचा कल डेमोक्रॅट्सकडे झुकल्याचे पाहून ट्रम्प यांनी स्वतःचा बचाव करत हा पराभव स्वतःच्या खात्यावर घेण्याचे टाळले आहे.

I wasn’t on the Ballot and if I was, we would have won IN A LANDSLIDE! Thank you for your attention to this matter. President DONALD J. TRUMP

( TS: Nov 3 2026, 10:37 PM ET )​​​​​​​​‍‌​​‌​‍‍‌‍‍‍‌‌‍‍​‌‌​​‌​‌‍​‍‌‌‌​‍​‌‍ https://t.co/sZG6BGvmsL— Commentary Donald J. Trump Truth Social Posts On X (@TrumpTruthOnX) November 4, 2026

उमेदवारांवरही ढकलली पराभवाची जबाबदारी
एका न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करताना काही उमेदवार मतदारांना पसंत नसल्याचे सांगितले. काही उमेदवार आपले समर्थक नव्हते आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या मतदारांनी मतदानासाठी उत्साह दाखवला नाही, असे त्यांचे म्हणणे होते. “काही ठिकाणी मतदारांना उमेदवार आवडले नाहीत, तर काही ठिकाणी ते उमेदवार माझे मित्र नव्हते. हे पक्षाच्या समर्थकांना चांगलेच माहीत होते आणि त्यांनी मतदानासाठी बाहेर पडणे टाळले,” अशा आशयाचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले.

महागाई आणि इराण युद्ध मतदारांच्या नाराजीचे प्रमुख मुद्दे
असोसिएटेड प्रेसच्या मतदार सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील सुमारे तीन-चतुर्थांश मतदार देशाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत नाराज किंवा संतप्त होते. अर्थव्यवस्था चांगली नसल्याचे मतही मोठ्या प्रमाणावर व्यक्त करण्यात आले. जवळपास ८० टक्के मतदारांनी महागाईमुळे आपल्या कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. महागाई, जीवनावश्यक वस्तूंचा वाढता खर्च आणि सरकारी भ्रष्टाचार हे मतदानासाठी महत्त्वाचे मुद्दे ठरले. इराणमधील युद्धाचाही मतदारांच्या निर्णयावर परिणाम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या पराभवामागे केवळ उमेदवारांची निवड नव्हे, तर सरकारच्या धोरणांबाबतची नाराजीही महत्त्वाची ठरल्याचे चित्र आहे.

दोन्ही सभागृहांवरील नियंत्रण गमावल्याने ट्रम्प यांच्यासमोर नवे आव्हान
डेमोक्रॅट्सनी सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवल्याने ट्रम्प प्रशासनासाठी पुढील दोन वर्षे राजकीयदृष्ट्या आव्हानात्मक ठरणार आहेत. डेमोक्रॅट्सनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी आणि सरकारी निर्णयांची अधिक छाननी करण्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय, ट्रम्प यांच्या धोरणांशी संबंधित विधेयकांना संसदेची मंजुरी मिळवणेही कठीण होऊ शकते. ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्सच्या विधेयकांवर व्हेटो वापरण्याचा इशारा दिला आहे. मात्र, निवडणुकीनंतर त्यांनी विरोधकांना शुभेच्छा देत देशाच्या हितासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची तयारीही दर्शवली आहे.

ताज्या बातम्या