अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विवाहितेच्या फिर्यादीवरून पती व सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमदान हाडको, सावेडी येथे राहणार्या पीडित विवाहितेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पती अमोल हरीभाऊ थोरात, सासू रतन हरीभाऊ थोरात, मोठा दीर सुभाष हरीभाऊ थोरात, मधला दीर सुनील हरीभाऊ थोरात, लहान दीर सागर हरीभाऊ थोरात, मोठी जाऊबाई रेश्मा सुभाष थोरात, जाऊबाई जोत्स्ना सुनील थोरात (सर्व रा. भूषणनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादीचा विवाह 2 जून 2024 रोजी अमोल हरिभाऊ थोरात याच्यासोबत संपन्न झाला होता. विवाहानंतर सुरूवातीला काही महिने संसार सुरळीत चालला. मात्र, त्यानंतर पती अमोल थोरात, सासू रतन थोरात, तसेच दीर आणि जावांनी मिळून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरूवात केली. पती व सासरच्यांनी हुंड्याच्या स्वरूपात 50 हजार रुपये आणि एक तोळा सोन्याची अंगठी आणण्याची मागणी केली. तसेच घरकाम जमत नसल्याच्या कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केली. इतकेच नव्हे, तर गरोदर राहिल्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी गर्भपात करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. तडजोडीसाठी जानेवारी 2025 मध्ये भरोसा सेल येथे समुपदेशनही झाले. मात्र, सासरच्यांनी तिला नांदवण्यास नकार दिल्याने अखेर विवाहितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.