Friday, December 13, 2024
Homeनगरडॉ. जावळेंच्या शासकीय निवास्थानी आढळले 18 लाखांच्या वस्तू

डॉ. जावळेंच्या शासकीय निवास्थानी आढळले 18 लाखांच्या वस्तू

सहा तासांच्या झाडाझडतीनंतर आढळले अवघे 50 रुपये

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून महापालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानाची शनिवारी तब्बल सहा तास झडती घेण्यात आली. या झडतीत कोणतीही मोठी रोकड अथवा दागिने आढळून आलेले नाहीत. मात्र, दोन दुचाकीसह घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू व उपकरणे कपडे अशा विविध 17.89 लाखांच्या वस्तूंची नोंद करण्यात आली आहे. हे घर शासकीय निवासस्थान असल्याने यातील वस्तूंबाबत महापालिकेकडून माहिती मागविण्यात आल्याचे तपासी अधिकारी उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले. दरम्यान झडती वेळी घरामध्ये फक्त पन्नास रुपये आढळून आल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

आठ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे व स्वीय सहाय्यक शेखर उर्फ श्रीधर देशपांडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोघांचा तीन पथकांमार्फत शोध घेतला जात आहे. दरम्यानच्या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने न्यायालयाच्या परवानगीने मनपा अधिकार्‍यांच्या उपस्थितीत आयुक्तांचे शासकीय निवासस्थान व त्यांच्या दालनाची झडती घेतली. सायंकाळी पाच वाजता सुरू झालेली घराची झडती रात्री अकरा वाजता पूर्ण करण्यात आली. यात आयुक्त बंगल्याच्या आवारात लावण्यात आलेली बुलेट व एक मोपेड अशा दोन दुचाकी, घरातील फर्निचर, टीव्ही, फ्रिज, ओव्हन, एसी, फॅन यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे आदींची मोजणी करून त्याची नोंद करण्यात आली आहे.

हे निवासस्थान शासकीय असल्याने यातील बहुतांशी वस्तू या महापालिकेच्या मालकीच्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय निवासस्थानातील महापालिकेच्या वस्तू संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माहिती मागविली आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर महापालिकेच्या मालकीच्या वस्तू वगळून इतर वस्तू व साहित्यांची नोंद डॉ. जावळे यांच्या नावाने करण्यात येणार आहे. घराच्या झडतीनंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास महापालिकेतील आयुक्त दालनाची तपासणी सुरू करण्यात आली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही झडती सुरू होती. मात्र यातही काहीच ठोस हाती लागलेले नाही. संपूर्ण झडतीमध्ये रोख रक्कम, दागिने अथवा मालमत्तेची माहिती आढळून आलेली नसल्याचे तपासी अधिकारी लोखंडे यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या