मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील सरकारी नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, कॉपी आणि संघटित गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार कठोर उपाययोजनांच्या तयारीत आहे. पेपरफुटीच्या संघटित गुन्ह्यांमध्ये सहभागी व्यक्ती आणि संस्थांना ७ ते १० वर्षांपर्यंत कारावास, किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्य सरकारला सादर करण्यात आला. अनेक नवीन शिफारशी सुचवण्यात आल्या असून या लागू झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा तरुणांना होणार आहे.
पेपर फोडणाऱ्यांना १० कोटींचा दंड, १० वर्षे कारावास
राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२६ रोजी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीने आपला दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाला सादर केला आहे. अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाखांपर्यंत दंडाची शिफारस करण्यात आली आहे. या सोबतच गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्थांना ५ कोटींपर्यंत दंड आणि ८ वर्षांसाठी बंदी घालावी असे देखील सुचवण्यात आले आहे. परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची शिफारस या समितीने केली आहे. गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे.
Nashik News: सिंहस्थाच्या तयारीत रोजगाराच्या संधी बंद; टपऱ्यांना परवानगी देण्यास मनपाचा नकार
जलदगती न्यायालये स्थापन करणार
गंभीर प्रकरणांचा सखोल आणि वेगवान तपास होण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच पेपरफुटीच्या गुन्ह्यांचा तपास थेट वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजेच अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय, न्यायिक प्रक्रिया गतिमान करून प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.
उमेदवारांसाठी आधार किंवा MahaID द्वारे एकदाच नोंदणीची सुविधा
उमेदवारांसाठी आधार किंवा MahaID द्वारे एकदाच नोंदणीची सुविधा देण्यात येईल. परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेत मोठे प्रशासकीय बदल सुचवण्यात आलेत. रिक्त पदांची माहिती वेळेत मिळण्यासाठी Integrated Requisition Portal विकसित करण्याची शिफारस करण्यात आली. सप्टेंबरअखेरपर्यंत विभागांनी भरतीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवावे असे म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्याची सूचना देण्यात आली.
परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक (Venue Bank) तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या निवडी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेतील सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची शिफारस केली. राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असेल. राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२६ रोजी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल. समितीचा दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाला सादर केला गेला. या शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल अपेक्षित आहेत.




