Tuesday, September 29, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

Ahilyanagar : ‘बॉस’ने सांगितलं म्हणजे विषय संपला

जिल्हा बँकेबाबत डॉ. सुजय विखे यांचे रोखठोक उत्तर || राहाता, कर्जत-जामखेडसह काँग्रेस नेत्यांना काय वाटते याला अर्थ नाही

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील नेत्यामध्ये माझ्या नावावर सहमती होत नसेल आणि वाद होत असतील, तर मला जिल्हा बँकेच्या पदावर बसण्याची कोणतीही इच्छा नाही, असे स्पष्ट करत डॉ. सुजय विखे यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली आहे. तसेच या राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तोच अंतिम निर्णय होईल आणि तीच व्यक्ती जिल्हा बँकेत अध्यक्ष होईल. बाकी राहाता, कर्जत-जामखेडसह काँग्रेसच्या नेत्यासह कोणाला काय वाटते याला अर्थ नाही, असे रोखठोक उत्तर डॉ. विखे पाटील यांनी दिली. बॉसने सांगितलं म्हणजे गोष्ट संपली असेही सांगण्यास ते विसरले नाहीत.

- Advertisement -

रविवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्षांतर्गत वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयालाच अंतिम मानणार असल्याचे सांगितले.पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. विखे म्हणाले, कुठलीही निवडणूक लागली की माझं नाव येतं, पण मला काही मिळत नाही. गेल्या सहा-सात महिन्यांपासून हेच चाललं आहे. विधानसभा लागली तर सुजय विखे आमदारकीला, विधान परिषद लागली तर सुजय विखे आमदारकीला आणि जिल्हा बँक लागली तरी माझंच नाव पुढे येतं. जिल्हा परिषदेत आरक्षण पडलं म्हणून ठीक आहे, नाहीतर तिथेही माझं नाव चालवलं असतं.

जिल्हा बँकेचे महत्त्व अधोरेखित करताना ते पुढे म्हणाले, जिल्हा बँक ही शेतकर्‍यांच्या अस्मितेची आणि जिवाळ्याची संस्था आहे. सहकार क्षेत्रातील लोकांनी ही संस्था चालवणं योग्य राहील, जेणेकरून शेतकर्‍यांना न्याय मिळेल. आज नॅशनल बँका शेतकर्‍यांना सहज कर्ज देत नाहीत, पण अहिल्यानगर जिल्हा बँकेने शेतकर्‍यांना नेहमीच आधार दिला आहे. आपल्या पदाबाबत आणि पक्षाच्या आदेशाबाबत बोलताना ते ठामपणे म्हणाले, या खुर्चीवर तोच बसेल ज्याचे नाव देवेंद्र फडणवीस सांगतील. बाकी कोणाला काय वाटतं याच्याशी मला काही देणं-घेणं नाही. राज्याला मुख्यमंत्री आहेत आणि ते आमचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी ज्याचे नाव निश्चित केले, ते काम होणार. बॉसने बोल दिया होने का, तो होने का! आमच्याकडे बाकी विचार करत बसत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.

भोसाखिंड बोगदा होण्यासाठी प्रत्येक आमदारांचे श्रेय आहे. यासाठी दक्षिणेतील आमदारांनी आपआपल्या परीने योगदान दिलेले आहे. या बोगद्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदार यांनी काय प्रयत्न केले याबाबत आपल्याकडे माहिती नाही. मात्र, ते म्हणत असतील तर त्यांच्याकडे काहीतरी पूरावा असलेच. हा विषय श्रेयवादाचा नाही. राज्यातील सर्व आमदार मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. नगर-करमाळा, नगर शहरातील उड्डाणपूलाचे काम मी मार्गी लावले. मात्र, या कामाच्या श्रेयाचे रुपांतर मतात होते की नाही, हे सांगत येणे कठीण असल्याचे विखे यावेळी म्हणाले.

ग्रामीण भागातील डीजे वापराचे समर्थन
ग्रामपंचायत आणि ग्रामीण भागांमध्ये डीजेचा त्रास जाणवत नाही; कारण तिथे मोकळी हवा, मोकळी जागा आहे आणि उंच इमारतींचा अडथळा नाही. शहरांमध्ये ट्रॅफिक, दाट लोकसंख्या, इमारती आणि रुग्णालये यांमुळे तिथले प्रश्न वेगळे आहेत, ज्यामुळे तिथे नियमांची गरज भासते. ग्रामीण भागातील तरुणांना शहरी झेन झेड ही व्याख्या न लावता, ते आमचे स्थानिक युवक असल्याचे सांगत त्यांच्या उत्साहाचे समर्थन आवश्यक आहे. ग्रामीण भागातील तरुण कार्यकर्त्यांच्या आनंदासाठी आणि उत्सवांसाठी डीजे आणि संगीताला परवानगी दिली पाहिजे, अशी भूमिका डॉ. विखे पाटील यांनी यावेळी मांडली.

काही नगरसेवक व्यवसाय, प्लॉटिंगमध्ये व्यस्त
यावेळी डॉ. विखे पाटील यांनी भाजपच्या निष्क्रिय नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांना कडक इशारा दिला आहे. जे नगरसेवक आणि पदाधिकारी पक्षाच्या कामात योगदान देणार नाहीत, त्यांना पक्षीय स्तरावरून कोणतीही ताकद किंवा मदत मिळणार नाही. नगरमधील मधील काही नगरसेवक स्वतःच्या व्यवसाय, प्लॉटिंग किंवा इतर कामांमध्ये व्यस्त असून पक्षाच्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करत आहेत. पक्षाकडून मिळालेल्या पदाचा आणि सन्मानाचा योग्य आदर ठेवला गेला पाहिजे. जर नगरसेवक, सरपंच किंवा जिल्हा परिषद सदस्य पक्षासाठी वेळ देऊ शकत नसतील, तर पक्षाचे नेतृत्वदेखील त्यांच्यासाठी वेळ देणार नाही. पालकमंत्री यांच्यावतीने हा स्पष्ट निरोप देण्यात आला असून, आगामी काळात फक्त पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या कार्यकर्त्यांनाच पक्षाची ताकद आणि सहकार्य लाभेल.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंविरोधात बोलल्याने धमक्या, महिलेकडून पोलिसांत तक्रार; थेट…

0
जालना । Jalna मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला सातत्याने घेरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणींत दिवसागणिक वाढ होत असल्याचे चित्र आहे. अंतरवाली सराटीतील २० दिवसांच्या...