नाशिक | प्रतिनिधी
नीलवसंत मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरतर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार 2026 पालघर जिल्ह्यातील मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात सेवाकार्य करणार्या श्रद्धा शृंगारपुरे यांना जाहीर करण्यात आला आहे.
संस्थेचे संस्थापक विश्वस्त व नाशिक जिल्ह्यातील समाजाभिमुख बहुआयामी व्यक्तिमत्त्व पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त 2012 पासून हा पुरस्कार दिला जात आहे. शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती अथवा संस्थेचा या पुरस्काराने गौरव केला जातो.
पुरस्कार समितीच्या अध्यक्षा नीलिमाताई पवार यांनी आज पुरस्काराची घोषणा केली. त्या म्हणाल्या, मोखाडा व परिसरातील अतिदुर्गम भागात स्वराज फाउंडेशनच्या माध्यमातून सेवाकार्याचा यज्ञ सुरू ठेवणार्या श्रद्धा शृंगारपुरे यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी महाग! नवे दर लागू; कोणत्या कंपनीने वाढवले दर?
नीलवसंत फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण व वंचित घटकांसाठी आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महिला सक्षमीकरण तसेच इतर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.
पुरस्कार वितरण सोहळा ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे होणार आहे. पुरस्कार समितीच्या अध्यक्षा नीलिमाताई पवार यांच्या हस्ते शृंगारपुरे यांचा गौरव करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे आहे. निलवसंत मेडिकल फाउंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर नासिक आयोजित पत्रपरिषदेत शकुंतला वाघ, डॉ प्राची पवार, रविंद्र मनियार, रंजना पाटील, डॉ ओमप्रकाश कुळकर्णी, नारायण थेटे, आदी उपस्थीत होते.




