नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इंधन दरवाढीचा झटका वाहनधारकांना बसला आहे. खासगी इंधन विक्रेती कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ ३ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या तसेच पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये नायरा कंपनीच्या पेट्रोलचा दर ११७.२३ रुपये, तर डिझेलचा दर १०१.५७ रुपये प्रतिलिटर झाला आहे.
देशभरात नायरा एनर्जीचे ७,१०८ पेट्रोलपंप आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती आणि देशांतर्गत किरकोळ विक्रीच्या दरांमधील वाढती तफावत कमी करण्याच्या उद्देशाने ही दरवाढ करण्यात आल्याचे समजते. नायरा एनर्जीने यापूर्वी 26 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रति लिटर वाढ केली होती. इराणमधील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाल्यानंतर ही दरवाढ करण्यात आली होती. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर आणि पश्चिम आशियातील तणाव काहीसा निवळल्यानंतर कंपनीने 1 जुलै रोजी ही वाढ मागे घेतली होती.
मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची घोषणा
कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि इंधन विक्रीवरील वाढता खर्चामुळे पेट्रोल पंपावरील विक्री किंमत आणि कंपनीचा खर्च यातील फरक कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिकमध्ये नायराचे दर किती?
नाशिकमध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपांवरील पेट्रोलचा दर सुमारे ११२.४४ रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचा दर सुमारे ९९.०५ रुपये प्रतिलिटर आहे. उपलब्ध इंधन दरमाहितीनुसार २ ऑक्टोबरच्या तुलनेत या दरांमध्ये ३ ऑक्टोबरला कोणताही बदल झालेला नाही. यामुळे नायरा आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर सुमारे ४.७९ रुपयांचा, तर डिझेलच्या दरात २.५० रुपयांचा फरक निर्माण झाला आहे.
सरकारी कंपन्यांचे दर काय?
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांचे देशातील ९० टक्क्यांहून अधिक पेट्रोल पंपांवर नियंत्रण आहे. त्यांच्या किरकोळ दरांमध्ये तुलनेने स्थिरता कायम आहे. त्यामुळे नायरा आणि सरकारी कंपन्यांच्या पंपांमधील दरातील तफावत वाढू शकते.
तेल कंपन्यांवरही वाढता दबाव
आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना देशांतर्गत किरकोळ पेट्रोल-डिझेलचे दर त्याच प्रमाणात वाढले नाहीत, तर तेल विपणन कंपन्यांच्या मार्जिनवर दबाव येतो. याच पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांकडून दरांमध्ये बदल होत असल्याचे समजते आहे. दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाने खासगी इंधन विक्रेत्यांनी पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर मनमानी मर्यादा लागू करू नयेत, अशी भूमिका घेतली आहे. नायरा आणि जिओ-बीपीच्या काही पंपांवर विक्री मर्यादित करण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा मुद्दा स्पष्ट केला होता.




