अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने अहिल्यानगर शहर पोलिसांनी दारू पिऊन वाहने चालविणार्यांवर कारवाई सुरू केली आहे. शहर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून या दरम्यान संशयित वाहन चालकांची तपासणी करण्यात येत आहे. चालकाने मद्याचे सेवन केलेले असल्यास त्याच्याविरूध्द थेट गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
दारू पिऊन वाहन चालवणार्या अशा दोघांवर तोफखाना पोलिसांनी रविवारी सायंकाळी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. भिस्तबाग चौकाजवळ नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली. दत्तू सर्जेराव घोडके (रा. सिध्दार्थनगर, आहिल्यानगर) हा त्याची दुचाकीवरून (एमएच 16 एआर 7065) दारूच्या नशेत गाडी चालवताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दीपक प्रभाकर तांदळे (रा. गाडेकर चौक, अहिल्यानगर) हा त्याची दुचाकी (एमएच 16 सीएक्स 9216) दारू पिऊन चालवत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरूध्द देखील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आज (31 डिसेंबर) थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. मद्य सेवन करून वाहन चालवित असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी मद्य सेवन करून वाहने चालवू नये असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.