जालना | Jalana
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या १७ दिवसांपासून उपोषणाला बसले आहे. जरांगे पाटील हे उद्यापासून मुंबईच्या दिशेने निघणार असून त्यांच्या मागण्यांबाबत अद्यापही सरकारकडून कोणताही ठोस तोडगा काढलेला नाही. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाने पुन्हा एकदा निर्णायक वळण घेतले आहे. अंतरवाली सराटी येथील उपोषण आणि मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील यांनी सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी मोठी घोषणा केली. “सगळे नाही, तर मी एकटाच मुंबईला येतोय; आता सरकार कशी परवानगी देत नाहीत तेच बघतो,” अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
मुंबई पोलिसांच्या निर्णयानंतर जरांगे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी त्यांनी मोठ्या संख्येने मराठा समाजाने मुंबईकडे यावे, असे आवाहन केले होते. मात्र आता आपण एकट्याने मुंबईला जाण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी का नाकारली?
जरांगे पाटील यांनी १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचे नियोजन जाहीर केले होते. त्यासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र पोलिसांनी ती नाकारली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनादरम्यान आमरण उपोषण किंवा आत्मदहनाच्या प्रयत्नासंबंधी नियम, आंदोलनासाठी एका वेळी एक दिवसाची परवानगी, वाहतूक कोंडीची शक्यता, सार्वजनिक ठिकाणी अडथळा आणि मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत आल्यास कायदा-सुव्यवस्थेवर निर्माण होणारा ताण अशी विविध कारणे देण्यात आली आहेत.
याशिवाय गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठी गर्दी होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, असेही पोलिसांनी नमूद केले आहे. आझाद मैदानाची क्षमता आणि मोठ्या संख्येने आंदोलक येण्याची शक्यता हेदेखील पोलिसांच्या निर्णयामागील कारणांमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.
“आता कशी परवानगी देत नाहीत तेच बघतो”
उद्याच्या आंदोलनाबाबत महत्त्वाची माहिती देतोय. त्यावर लक्ष ठेवा. विनाकारण कुणीही नाराज होऊ नका. कुणाला काही वाटू देऊ नका. आपल्याच हिताचे हे निर्णय आहेत. आरक्षणासाठी महत्त्वाचे आहेत. उद्या १५ सप्टेंबरला आपण सकाळी ११ वाजता मुंबईला निघणार आहोत. मुंबईला तर जायचं आहे, त्यात बदल नाही. वेळ प्रसंगी जीव द्यायची वेळ आली तरी चालेल, पण मुंबईला जाण्याचा दिलेला शब्द मागे घेणार नाही. मराठ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही. शब्द मागे घेणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आता आपल्याल रणनीतीमध्ये बदल करावे लागतील. फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकायचा आपण. मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारले ना, मग 15 तारखेला मी एकटा मुंबईला निघतो. आता मला एकट्याला देवेंद्र फडणवीस परवानगी देणार की नाही? मराठे मुंबईत गेल्यावर अडचणी निर्माण होणार, मग मी एकटा गेल्यावर परवानगी देणार नाही का?, असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. मी आधी एकटा खिंड लढतो, मराठ्यांच्या वाटेतील काटे दूर करु द्यात, म्हणजे तुम्हाला अडचण होणार नाही. रस्त्यातील काटे संपतील मग तुम्हाला सांगतो कधी यायचं मुंबईला. त्यामुळे आता मुंबईच्या मराठा आंदोलनासाठी तयार केलेल्या गाड्या आणि वर्गणी तशीच ठेवा. त्यामधील एक रुपयाही खर्च करु नका. मी आता सलाईन काढली आहे, त्यामुळे पोटात आग व्हायला सुरुवात झाली आहे. पुढील पाच-सहा दिवसांचा माझा प्रवास जीवघेणा आहे. मी मुक्काम करताना कोणाच्याही घरी राहणार नाही, चौकात राहीन. ही शेवटची झुंज होणार आहे. एकाच दिवशी सगळी ताकद वाया नाही घालवायची. आपली राखीव फौज ठेवायची आहे, जसे शिवाजी महाराजांनी केले. माझ्यावर नाराज होऊ नका, मी खिंड लढतो, मला तुमच्या रस्त्यावरचे काटे मला काढू द्या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले.
मुंबई पोलिसांनी कालच मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील उपोषणाला अनेक कारणे देऊन परवानगी नाकारली होती. मात्र, आता मनोज जरांगे यांनी मी एकटा येतो सांगून नवा डाव टाकला आहे. यावर आता मुंबई पोलीस काय भूमिका घेतात, हे बघावे लागेल. मनोज जरांगे 15 तारखेला सकाळी अंतरवाली सराटीतून निघतील. त्यानंतर पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर, खोपोलीमार्गे 19 सप्टेंबरला मुंबईत पोहोचणार आहेत. पोलीस त्यांनी मुंबईच्या वेशीवर रोखणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.




