Thursday, May 2, 2024
Homeनाशिक‘बेस्ट’च्या सेवेला गेलेले वाहक, चालक उपाशी

‘बेस्ट’च्या सेवेला गेलेले वाहक, चालक उपाशी

नाशिक । कुंदन राजपूत Nashik

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या बेस्टच्या मदतीसाठी एसटीच्या नाशिक विभागातून 300 बसेस पाठविण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

गाडी सोबत गेलेल्या वाहक चालकांची बेस्टकडून राहण्याची व जेवणाची लॉजमध्ये व्यवस्था केली जाणार होती. पण प्रत्यक्षात वाहन चालकांचे तेथे जेवणाचे हाल होत असून वडापाव खाऊन दिवस काढावा लागत आहे. एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील रेस्ट हाऊसमध्ये अस्वच्छतेत दाटीवाटीने झोपावे लागत आहे.

या ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. दाटीवाटीत करोनाचा संसर्ग नको या भितीपोटी अनेकांना बसमध्येच झोपून रात्र काढात आहे.त्यावर कढी म्हणजे नाशिक विभाग व्यवस्थापनाने बेस्टला सेवा देण्यास नकार देणार्‍या 60 हून अधिक वाहक चालकांना कामावरुन बडतर्फच्या नोटिसा पाठविल्या आहे.

लोकल पूर्ण क्षमतेने सुरु नसल्याने चाकरमान्यांना बेस्ट बस सेवा हा वाहतुकीसाठी एकमेव पर्याय आहे. मात्र प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बेस्टची बस संख्या अपुरी ठरत आहे. ते बघता परिवहन विभागाने एसटी महामंडळाच्या बसेस बेस्टच्या मदतीसाठी पाठविण्यात आल्या. नाशिक विभागातून साधारणत: 300 बसेस मुंबईला पाठविण्यात आल्या.

करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता नाशिक येथील वाहक व चालकांची जेवण व राहण्याची व्यवस्था हॉटेल अथवा लॉजमध्ये केली जाईल असे बेस्टकडून सांगण्यात आले. मात्र मुंबईतील मुसळधार पावसामुळे नाशिकहून पाठविण्यात आलेल्या बसेस ठाणे येथील खोपट डेपोत अडकल्या. तेथे त्यांची कोणतीही व्यवस्था नसल्याने वाहक व चालकांना स्व:खर्चाने जेवणाची व्यवस्था करावी लागली व बसमध्येच रात्र काढावी लागली.

दुसर्‍या दिवशी मुंबई सेंट्रलला पोहचल्यावर तेथे तरी किमान राहण्याची व जेवणाची चांगली व्यवस्था होईल ही अपेक्षा होती. मात्र, तीनशे पैकी दिडशे ते दोनशे जणांचीं रात्री उशीरा जेवणाची व्यवस्था करण्यात आली. उर्वरीत वाहक व चालकांना स्वताच्या खिशातील पैसे खर्च करुन जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे.

नाश्ता मिळावा यासाठी तासन् तास रांगेत उभे रहावे लागत आहे. झोपण्याची तर अजून वाईट अवस्था आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे गरजेचे असताना मुंबई सेंट्रलच्या रेस्ट हाऊस वाहक चालकांच्या गर्दीने गचागच भरले आहे. सोशल डिस्टन्सचा या ठिकाणी फज्जा उडाला असून करोनाच्या भितीने अनेकाना उघड्यावर रात्र झोपून काढावी लागत आहे.त्यामुळे अनेक वाहक चालक बेस्टला सेवा देण्यास नकार देत आहे.

नाशिक व्यवस्थापन वाहक चालकांच्या सुविधेसाठी पाठिशी उभे राहण्याऐवजी सेवेस नकार देणार्‍या कर्मचार्‍यांना बडतर्फच्या नोटिसा बजावण्यात धन्यता मानत आहे.75 रुपये प्रति किलोमीटर बेस्टला सेवा देणार्‍या नाशिक विभागाच्या बसेसला प्रति किलोमीटर 75 रुपये दिले जातात. दिवसभरातून साधारण दिडशे ते दोनशे किलोमीटर फेर्‍या होतात.

करोना संकटात दिवसभर सेवा देऊनही दोन वेळेचे पोटभर जेवणाची अबाळ होत असून रात्रीच्या झोपेचे खोबरे होत आहे. करोनाची लागण तर होणार नाही ना व सेवेस नकार दिल्यास बडतर्फची नोटिस हातात मिळेल या दडपणाखाली वाहक व चालक काम करत आहेत.

बेस्टने शब्द पाऴला नाही

जेवण व निवासाची व्यवस्था नाकारण्यात आली.

नाशिकहून पाठविण्यात आलेल्या बसेसची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला.

रस्ते माहित नसल्याने प्रत्येक बसला गाईड दिला जाणार होता. पण नंतर नकार देण्यात आला.

आगाऊ रक्कम दिली जाणार होती. पण ती देखील देण्यात आली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या